शिवारात तंबू ठोकून मांडले ठाण : न्याय मिळेपर्यंत लढणार : आज जिल्हाधिकाऱयांशी चर्चा
वार्ताहर / किणये
न्यायालयाने हलगा-मच्छे बायपास रस्त्याला स्थगिती दिलेली आहे. असे असतानाही प्रशासनामार्फत मोठा फौजफाटा घेऊन मंगळवारी मच्छे येथे बायपास रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, शेतकऱयांनी या ठिकाणी धाव घेऊन बायपास रस्त्याला तीव्र विरोध केला. ‘आधी आमच्या अंगावरून जेसीबी चालवा, त्यानंतरच रस्ता करा’, असा पवित्रा यावेळी शेतकऱयांनी घेत आलेल्या अधिकाऱयांना जाब विचारल्यामुळे अधिकाऱयांनी तेथून पळ काढला. मात्र, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार शेतकऱयांनी केला असून बुधवारीही मच्छे शिवारातच शेतकरी ठाण मांडून होते.
मंगळवारी सकाळी दंडेलशाही मार्गाने प्रशासनाने मच्छे शिवारातून बायपास रस्त्याचे काम करण्याचा घाट घातला होता. यावेळी मोठय़ा पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार हजर होते. घटनास्थळी शेतकरीही मोठय़ा संख्येने दाखल झाले आणि या बायपास रस्त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे, उच्च न्यायालयाने या रस्त्याला स्थगिती दिलेली आहे.
तरीही तुम्ही आम्हा शेतकऱयांवर अन्याय का करत आहात, असा सवाल केल्यानंतर संबंधित अधिकाऱयांनी नमती भूमिका घेतली.
मच्छे शिवारात मंगळवारी दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हलगा-मच्छे बायपाससाठी जुने बेळगाव, शहापूर, वडगाव, अनगोळ, मच्छे, पिरनवाडी या परिसरातील जमिनी जाणार आहेत. या जमिनीमध्ये वर्षाला दोन ते तीन पिके घेण्यात येतात. ही सुपीक जमीनच प्रशासनाने हिसकावून घेतली तर या परिसरातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.
कर्नाटक रयत संघटनेने शेतकऱयांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला असून मंगळवारी व बुधवारी या संघटनेचे कार्यकर्ते व बेळगाव परिसरातील शेतकरी मच्छे शिवारात ठाण मांडून होते. कोणत्याही परिस्थितीत आपली पिकावू जमीन देणार नाही, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. मच्छे शिवारातच तंबू ठोकून न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राजू मरवे, प्रकाश नायक यांनी दिली आहे. मंगळवारी मच्छे शिवारात मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. कामकाज सुरू करण्यासाठी जेसीबीही आणला होता. बुधवारी मात्र त्या ठिकाणी एकही जेसीबी निदर्शनास आला नाही. पोलीस फौजफाटा कमी करून मोजकेच पोलीस तैनात आहेत. आंदोलनाच्या ठिकाणीच शेतकऱयांनी आपली भोजन व्यवस्था केली आहे. बुधवारीही शेतकरी ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणा देत होते. यावेळी त्यांनी प्रशासनाविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.









