चीनविरोधात मेठे पाऊल उचलण्याची शक्यता : 20 जानेवारीपर्यंत कार्यकाळ शिल्लक
वॉशिंग्टन
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून स्वीकारलेला पराभव डोनाल्ड ट्रम्प यांना सहजासहजी विसरता येत नसल्याचे बोलले जात आहे. याचमुळे मतमोजणीत बायडेन यांना निर्णायक आघाडी मिळाल्यावरही ट्रम्प यांनी स्वतःचा पराभव मान्य केलेला नाही. 20 जानेवारीपर्यंत स्वतःच्या उर्वरित कार्यकाळादरम्यान ट्रम्प काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. त्यांचे हे निर्णय आगामी अध्यक्ष बायडेन यांच्यासाठी तापदायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
स्वतःचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ट्रम्प चीनच्या विरोधात राजनयिक आणि व्यापाराच्या क्षेत्रात अनेक कठोर निर्णय घेऊ शकतात. कोरोना महामारीस चीनच जबाबदार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी अनेकदा जाहीरपणे केला आहे. अशा स्थितीत अमेरिकेला या महामारीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी ट्रम्प चीनविरोधात कठोर निर्णय घेऊ शकतात.
तज्ञ साशंक
20 जानेवारीपूर्वी ट्रम्प अशाप्रकारचे पाऊल उचलू शकतात, असे अमेरिकेच्या वतीने चीनशी व्यापारविषयक वाटाघाटी करणाऱया पथकाचे सदस्य आणि जॉर्जटाउन विद्यापीठातील अध्ययनकर्ते जेम्स ग्रीन यांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने कधीच कुठल्याचे मापदंडांचे पालन केलेले नाही. अशा स्थितीत हँडओवर प्रक्रियांच्या संदर्भात चिंता सतावू लागल्याचे ग्रीन म्हणाले.
सिनेटची मंजुरी आवश्यक नाही
अमेरिकेच्या विदेश धोरणात कार्यकारी आदेश किंवा एजेंसी रुल मेकिंगनुसार ट्रम्प बदल घडवून आणू शकतात. याकरता त्यांच्यावर सिनेटची मंजुरी प्राप्त करण्याचे बंधन नाही. याच अनुकुलतेतून ट्रम्प चीनच्या विरोधात कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
निर्णयाचे स्वरुप
शिनजियांग प्रांतातील उइगूर मुस्लिमांची नजरकैद आणि नरसंहारासाठी चीनला दोषी ठरविण्याचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी शिनजियांगमध्ये नरसंहार घडविल्याचा आरोप चीनवर केला होता. याचबरोबर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या व्हिसावर बंदी घातली जाऊ शकते. 2022 मध्ये चीन येथे होणाऱया हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सामील न होण्यासाठी अमेरिकेच्या खेळाडूंना आदेश देण्याचा प्रयत्न ट्रम्प करू शकतात.
चीनविरोधात धारणा
प्यू रिसर्च सेंटरनुसार 73 टक्के अमेरिकन नागरिकांचा चीनसंदर्भात नकारात्मक दृष्टीकोन आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या लोकांमध्ये चीनविषयी विशेष नकारात्मक मानसिकता दिसून आली आहे. अमेरिकेने सुमारे 20 वर्षांपासून दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंटला यादीतून बाहेर काढत चीनला डिवचले आहे.
बायडेन यांची डोकेदुखी
ट्रम्प यांच्या प्रशासनाने यापूर्वीच चीनच्या अनेक उत्पादनांवर मोठे व्यापार शुल्क लादले आहे. चिनी ऍप टिकटॉक आणि वीचॅटवर बंदीही त्यांच्याच कार्यकाळात लादण्यात आली आहे. ट्रम्प यांनीच चीनच्या हुवेई टेक्नॉलॉजीच्या 5जी नेटवर्कवर सर्वप्रथम बंदी घातली होती. अमेरिकेनंतर कॅनडा आणि ब्रिटननेही याचे अनुकरण केले होते. ट्रम्प यांचे हे निर्णय बायडेन प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकतात. बायडेन यांना अधिक शक्तिशाली चीनला भिडावे लागणार आहे.









