सत्ता हस्तांतरण सुरळीत होण्याची चिन्हे
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे भावी अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या दोन महत्त्वपूर्ण व्यक्तींचा समावेश होण्याची शक्यता आहे. ख्यातकीर्त शल्यविशारद डॉ. विवेक मूर्ती आणि अरुण मजुमदार अशी त्यांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते बायडन यांच्या विश्वासातील असून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो अमेरिकेतील भारतीय वंशाच्या समाजाचा मोठाच गौरव ठरणार आहे, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची ठरू शकते, असेही बोलले जाते.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी सत्ता संपादनाची जोरदार सज्जता केली असून हे सत्तांतर सुरळीत होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असूनही त्यांनी अद्याप सत्ता सोडण्याची इच्छा दर्शविलेली नाही.
डॉ.मूर्ती सल्लागार म्हणून कार्यरत
डॉ. विवेक मूर्ती हे सध्या बायडन यांचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांच्यावर अमेरिकेत थैमान घातलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक योजना तयार करण्याचे महत्त्वाचे असे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे प्रा. मजुमदार हे अभियांत्रिकीतील उच्चविद्याविभूषित असून जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ऊर्जा या विषयात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. ते सध्या बायडन यांचे ऊजाविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातही महत्वाची भूमिका स्वीकारली होती. ओबामा यांनी त्यांची नियुक्ती ऊर्जाविषयक आधुनिक संशोधन प्राधिकरणाचे संस्थापक संचालक म्हणून केली होती. या नियुक्तीला अमेरिकेच्या वरिष्ठ प्रतिनिधीगृहाची संमतीही मिळाली होती. आपले मंत्रिमंडळ हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात बहुरंगी असेल असे बायडन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अमेरिकन मान्यवरांचा समावेश होण्याची शक्यता बळावली आहे.









