फॉरवर्डचे नेते जितेंद्र गावकर यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
मंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे मतदारसंघ म्हणजे गांधी मार्केट असल्यागत प्रचंड दहशत माजविली असून आपल्या विरोधात बोलणाऱयांची पोलीस बळाचा वापर करून सतावणूक चालविली आहे. विरोधात बोलणाऱयांच्या कुटुंबात एखादा सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्यावर बदलीद्वारे सूड उगविण्यात येत आहे, असे दावे गोवा फॉरवर्डचे नेते ऍड. जितेंद्र गावकर यांनी केले आहेत.
पणजीत पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजगावकर यांनी कितीही दहशत माजविली तरी पेडणे म्हणजे गांधीमार्केट नव्हे हे त्यांनी लक्षात ठेवावे, व योग्य वेळी पेडणेकर त्यांना धडा शिकवतील याचे स्मरण ठेवावे, असा इशारा गावकर यांनी दिला आहे.
मोपा विमानतळ प्रकल्पात आपण सुमारे 150 स्थानिकांना नोकऱया मिळवून दिल्याचा दावा आजगावकर करत आहेत, ते 150 स्थानिक पेडणेच्या कोणत्या भागातील आहेत यासंबंधी त्यांनी श्वेतपत्र काढावे, असे आव्हान गावकर यांनी दिले आहे. सध्य स्थितीत आजगावकर यांनी मोपा विमानतळ व्यवस्थापनावर पूर्ण ताबा मिळविला असून त्यांच्या शिफारशी शिवाय तेथील अधिकारी स्थानिकांशी बोलण्यास सुद्धा तयार होत नाहीत. त्याशिवाय मोपा प्रकल्पासाठी तिळारी कालव्यातील पाणी बेकायदेशीररित्या पुरविण्यात येत असून या घोटाळ्यात त्यांचीच माणसे पुरवठय़ात आजगावकर यांचीच माणसे गुंतली असल्याचा आरोप गावकर यांनी केला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून पेडणेतील स्थानिकांना पाणी, रस्ते यासारख्या समस्या भेडसावत आहेत. त्यांच्या मूलभूत गरजा सोडविण्यात आजगावकर यांनी पूर्ण अपयश आले आहे, आणि अशा नेत्यास काही लोक ’विकासपुरूष’ म्हणून संबोधतात. हा प्रकार आश्चर्यकारक आणि तेवढाच हास्यास्पद आहे, अशी टीकाही गावकर यांनी केली.









