ताळगावचे मनपात विसर्जन करण्याचा धूर्त प्रस्ताव
प्रतिनिधी/ पणजी
ताळगावचे पणजीत विसर्जन करुन महापालिकेचे स्वरुप पूर्वीप्रमाणेच करण्याच्या आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या प्रस्तावामुळे भाजपसमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणी तिरकी चाल सुरु केल्याने मूळ भाजपची मंडळी सावध झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोवा सरकार पणजी पालिकेच्या निवडणुकीची तयारी करीत होते. परंतु पणजी मनपामध्ये जरी भाजपची एक हाती सत्ता असली तरी मूळ भाजप आणि बाबूश मोन्सेरात भाजप असे दोन गट त्यात आहेत. त्यातील मूळ भाजप गटाने भाजपच्या नेत्यांना बाबूशपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. बाबूशने अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱयांना बाजूला हटवून आपल्या संपूर्ण पॅनलमध्ये युवा कार्यकर्त्यांचा भरणा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सध्याच्या जवळपास अनेक नगरसेवकांना उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित.
पणजी मनपामध्ये एकूण 30 जागा आहेत. त्यात मूळ भाजपकडे 13 तर बाबूश मोन्सेरात यांचे 15 नगरसेवक आहेत. सुरेंद्र फुर्तादो व त्यांची पत्नी हे दोन स्वतंत्र आहेत. मोन्सेरात पती – पत्नी भाजपमध्ये आल्यानंतर पणजी मनपामध्ये 28 भाजप आणि 2 अपक्ष असे समिकरण झाले. तथापि, भाजपमधील दोन गट मात्र स्वतंत्र आहेत. आता नव्याने निवडणूक घेण्याचा प्रश्न आला असता पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे मूळ भाजपच्या नगरसेवकांनी चर्चा केली. त्यानंतर तानावडे यांनी मोन्सेरात यांना मूळ भाजपचे 20 प्रभागांतील जागांना हात लावू नका उर्वरित 10 ठिकाणी तुमच्या आवडीचे उमेदवार निवडा असे कळविले होते.
बाबूश मोन्सेरातांचा धूर्त प्रस्ताव
तानावडे यांनी सांगितले तसे झाल्यास आपल्या हातची मनपावरील सत्ता जाण्याची भीती असल्याने मोन्सेरात यांनी पूर्ण ताळगाव ग्रामपंचायत पणजीत विलिन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तसे झाल्यास पणजी मनपा प्रभागांची संख्या 50 राहील व मोन्सेरात यांचीच एक हाती सत्ता पणजी मनपावर राहील. या प्रस्तावास मूळ भाजप नगरसेवकांनी पक्षांतर्गत आक्षेप घेतला आहे.
बाबूशकडून नगरसेवकांचे पंख छाटण्याचे प्रयत्न
दरम्यान, मोन्सेरात यांनी अनेक नगरसेवकांचे पंख छाटण्याचे ठरविले आहे व जास्तीत जास्त युवा कार्यकर्त्यांना निवडणुकीत उभे करण्याचे ठरविले आहे, जे त्यांच्या मतानुसार वागतील. भाजपमध्ये पणजीत दोन तट आहे. त्यात मूळ भाजपचे नगरसेवक हे मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव यांच्या संपर्कात आहेत. मनपावरुन पणजीचा गुंता हा भविष्यात वाढणार आहे.
ताळगावचे पणजीत विलिनीकरण करण्याचे ठरल्यास सारी प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागेल. त्यामुळे एकतर मनपा निवडणूकच पुढे ढकलावी लागेल. 16 मार्च नंतर मनपावर प्रशासक नियुक्त करावा लागेल असा अंदाज आहे. भाजपने मात्र या प्रश्नी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाबूश मोन्सेरात यांच्या तिरक्या चालीने मात्र भाजपची पणजीत अडचण वाढली आहे.









