माजी महापौरी सुरेंद्र फुर्तादोंकडे नेतृत्व : पणजीतील अनेक प्रतिष्ठितांचा समावेश
प्रतिनिधी /पणजी
माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजी महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या मोन्सेरात गटाविरोधात दंड थोपटले असून ‘वुई पणजेकार’ हा गट उभा करण्याचे ठरविले आहे. त्या गटाचे निमंत्रक म्हणून फुर्तादो यांना नेमण्यात आले असून पणजीतील प्रतिष्ठित नागरिकांना एकत्र आणून हा गट निवडणूक लढवणार आहे. भाजपने पणजी मनपासाठी उमेदवारी नाकारलेल्या आणि दुखावलेल्या काही इच्छुकांना एकत्र घेऊन हा गट तयार केला आहे. त्यांना गटाचे सहनिमंत्रक म्हणून नेमण्यात आले आहे.
मिनिनो डिक्रूझ, मलिसा सिमोईस, संदीप हेबळे, सुरेश चोपडेकर, पुंडलिक रायकर, सय्यद काद्री यांना या गटात स्थान देण्यात आले असून त्यांना उमेदवारी मिळणार आहे. या गटातर्फे पणजी महापालिकेच्या सर्व 30 वॉर्डात उमेदवार उभे करण्यात येणार असून पणजी मनपा ताब्यात घेण्याचे मोन्सेरात यांचे प्रयत्न धुळीला मिळविण्यासाठी हा गट काम करणार आहे. ‘वुई पणजेकार’ हा गट आणि त्याचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फुर्तादो यांनी दिली.
विद्यमान मंडळाने गेल्या 5 वर्षात फारसे काही केले नाही. या गटाने पणजीच्या विकासासाठी 5 वर्षाचा आराखडा तयार केला आहे. तो देखील घोषित करण्यात येणार आहे. सध्याच्या मंडळाविरोधात पणजीच्या जनतेत संताप असून त्यांना बाजूला ठेवण्यासाठी हा गट सक्रिय झाला आहे. या गटात सर्वांचा समावेश करण्यात येणार असून सूचनाही मागवण्यात आल्याचे ते म्हणाले.








