15 डिसेंबरपासून होते बेपत्ता
सावंतवाडी:
कोलगाव-चाफेआळी येथील रहिवासी लक्ष्मण ऊर्फ बाबा सखाराम गव्हाणकर (64) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसांपासून बाबा गव्हाणकर हे घरात आले नव्हते. सोमवारी त्यांचा मृतदेह ऍड. बापू गव्हाणकर यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
विहिरीजवळ आढळलेले एक चप्पल व मृतदेहाच्या अंगावरील कपडय़ावरून सदरचा मृतदेह बाबा गव्हाणकर यांचा असल्याची ओळख पटली. पंधरा फूट खोलीवर पाण्यात पूर्ण कुजलेल्या अवस्थेत मृतदेह होता. या घटनेची माहिती समजताच वकील, सामाजिक कार्यकर्त्यांनी कोलगाव येथे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांच्यासह कर्मचारी प्रसाद कदम, महेश जाधव, गुरू नाईक, दीपक सुतार, डी. व्ही. नाईक, नवनाथ शिंदे यांनी पंचनामा केला. मृतदेह पूर्ण कुजलेला असल्याने विहिरीबाहेर काढणे मुश्किल झाले. सांगेली येथील बाबल आल्मेडा, संदेश माळकर, सुनील मातोंडकर, लॉरेन्स आल्मेडा यांच्यासह आसिफ शेख, फारुख शेख, बाळा कुडतरकर, दिलीप वाडकर यांनी विहिरीत उतरून मृतदेह पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला.
बाबा गव्हाणकर हे 15 डिसेंबरपासून आपल्या घरी आले नव्हते. ऍड. गव्हाणकर व त्यांचे सहकारी त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते सापडले नव्हते. पोलीस ठाण्यातही याबाबत माहिती देण्यात आली होती. सोमवारी सकाळी तेथील एका वापरात नसलेल्या विहिरीजवळ दुर्गंधी येत असल्याने भाई धारपवार यांनी जाऊन विहिरीत पाहिले. त्यावेळी त्यांना उताणा अवस्थेत तरंगतांना मृतदेह दिसून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सांगेली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती सावंत यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी सांगितले. विहिरीच्या काठावर बसलेले असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
बाबा गव्हाणकर हे सावंतवाडी परिसरात परिचित व्यक्तिमत्व होते. क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळाचीही त्यांना आवड होती. सावंतवाडी शहर व कोलगावातील नागरिकांचे प्रश्न याबाबत नगरपालिका व आमदार दीपक केसरकर यांच्याकडे ते पाठपुरावा करत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पुतणे, जाऊ असा परिवार आहे.
प्रख्यात वकील बापू गव्हाणकर यांचे ते बंधू होत.









