नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी मिळालेल्या ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. कांता प्रसाद यांनी मद्यप्राशन करून झोपेच्या गोळय़ा घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 81 वषीय कांता प्रसाद गुरुवारी रात्री सव्वा 11 वाजण्याच्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसेच झोपेच्या गोळय़ा एकत्र घेतले होते. हीच माहिती त्यांच्या मुलानेही जबाबात दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीच्या मालवीर नगरमध्ये ढाबा चालवणारे कांता प्रसाद एका व्हिडीओनंतर वेगाने प्रसिद्ध झाले. लॉकडाऊनमध्ये रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर युटय़ूबर गौरव आणि कांता प्रसाद यांच्यात झालेल्या वादामुळे ते कायम चर्चेत राहिले. आता त्यांचा ढाबा बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.









