वृत्तसंस्था/ कराची
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत यजमान पाकचा पहिला डाव 304 धावांवर आटोपला. पाकच्या डावात कर्णधार बाबर आझम आणि आगा सलमान यांनी अर्धशतके झळकविली. इंग्लंडच्या लीचने 140 धावात 4 गडी बाद केले. दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 7 धावा जमविल्या. अब्रार अहमदने क्रॉलेला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने यापूर्वीच 2-0 अशी विजयी आघडी मिळविली आहे. या शेवटच्या कसोटीत पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीला बऱयापैकी फायदा उठविला. रॉबिनसन, लीच आणि वुड यांनी पाकच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. लीचने शपिकला 8 धावावर पायचीत केले. त्यानंतर वूडने शान मसूदला झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. अझहर अली आणि कर्णधार बाबर आझम यांनी तिसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागिदारी केली. रॉबिनसनने अझर अलीचा बळी मिळविला. त्याने 6 चौकारांसह 45 धावा जमविल्या. बाबर आझमने शकिल समवेत चौथ्या गडय़ासाठी 45 धावांची भर घातली. इंग्लंड संघात कसोटी पदार्पण करणाऱया फिरकी गोलंदाज रेहान अहमदने शकिलला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 23 धावा केल्या. रेहानचा हा कसोटीतील पहिला बळी ठरला. मोहम्मद रिझवानने 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. कर्णधार बाबर आझम एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 9 चौकारांसह 78 धावा केल्या. तो सहाव्या गडय़ाच्या रुपात तंबूत परतला. आगा सलमानच्या अर्धशतकामुळे पाकला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. अर्शफने 4, नौमन अलीने 3 चौकारांसह 20 तर अब्रार अहमदने 4 धावा जमविल्या. मोहम्मद वासिम 8 धावांवर नाबाद राहिला. पाकचा पहिला डाव 79 षटकात 304 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे लीचने 140 धावात 4 तर रेहान अहमदने 89 धावात 2, रॉबिनसन, वूड आणि रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंडने शेवटच्या 20 मिनिटांच्या संधी प्रकाशाच्या कालावधीत 3 षटकात 1 बाद 7 धावा जमविल्या. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर अब्रार अहमदने सलामीच्या क्रॉलेला पायचीत केले. डकेट 4 तर पॉप 3 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक – पाक प. डाव ः 79 षटकात सर्व बाद 304 (बाबर आझम 78, आगा सलमान 56, अझहर अली 45, मसूद 30, शकिल 23, नौमन अली 20, रिझवान 19, लीच 4-140, रेहान अहमद 2-79, रॉबिनसन 1-31, वूड 1-33, रुट 1-7), इंग्लंड प. डाव ः 3 षटकात 1 बाद 7 (क्रॉले 0, डकेट खेळत आहे 4, पॉप खेळत आहे 3, अब्रार अहमद 1-2).









