पहिली कसोटी पहिला दिवस : पाकची इंग्लंडविरुद्ध सावध सुरुवात
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत पावसामुळे खेळ थांबविण्यात आला तेव्हा 41.1 षटकांत 2 बाद 121 धावा जमविल्या होत्या. शान मसूद 45 व बाबर आझम 52 धावांवर खेळत होते. पंचांनी नंतर चहापानाचा ब्रेक जाहीर केला.
2010 नंतर इंग्लंडला पाकिस्तानविरुद्ध एकही मालिका जिंकता आलेली नाही. ही परंपरा यावेळी खंडित करण्यास ते उत्सुक झाले आहेत. या सामन्यात पाकचा कर्णधार अझहर अलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शान मसूद व अबिद अली यांनी सावध सुरुवात केली होती. पण सोळाव्या षटकांत जोफ्रा आर्चरने इंग्लंडला पहिले यश मिळवून देताना अबिद अलीला त्रिफळाचीत केले. अबिद अलीने 16 धावा केल्या तर पाकने यावेळी 36 धावा जमविल्या होत्या. दोनच षटकानंतर ख्रिस वोक्सने पाकचा कर्णधार अझहर अलीला पायचीत करून तंबूचा रस्ता दाखवित आणखी एक धक्का दिला. अझहरला खातेही खोलता आले नाही.
मसूद व बाबर आझम यांनी सावध खेळ करीत उपाहारापर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. उपाहारापर्यंत त्यांनी 2 बाद 53 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. त्यांनी संघाचे अर्धशतक 23 षटकांत फलकावर लावले. उपाहारानंतरच्या सत्रातही या दोघांनी इंग्लंडच्या माऱयाला समर्थपणे तोंड देत धावफलक हलता ठेवला आणि संघाचे शतक 37 व्या षटकात पूर्ण केले. मसूद सावध खेळण्यावर भर देत होता तर बाबर आझम काहीसा आक्रमक खेळत होता. त्याने या सत्रात अर्धशतकही 70 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. 40 षटकाअखेर दोघांनी 70 धावांची भागीदारी केली होती.
42 व्या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर पावसास सुरुवात झाल्याने खेळ थांबवाला लागला होता. यावेळी पाकने 41.1 षटकांत 2 बाद 121 धावा जमविल्या होत्या. बाबर 71 चेंडूत 52 तर मसूद 134 चेंडूत 45 धावांवर खेळत होते. पंचांनी काही वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिल्यानंतर चहापान घेण्याचा निर्णय घेतला.
या कसोटीत इंग्लंडने चार वेगवान गोलंदाजांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर पाकने तीन जलद आणि यासिर शहा व शादाब खान या दोन फिरकी गोलंदाजांना अंतिम संघात स्थान दिले आहे. कोरोनाच्या ब्रेकनंतरची पाकची ही पहिलीच क्रिकेट मालिका आहे तर इंग्लंडने नुकतीच विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. त्यांचा अष्टपैलू बेन स्टोक्स पूर्ण फिट नसल्याचे कर्णधार रूटने नाणेफेकीनंतर बोलताना सांगितले. त्यामुळे स्टोक्स या सामन्यात फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्याला गोलंदाजी देण्याचा धोका पत्करणार नसल्याचेही त्याने सांगितले.
संक्षिप्त धावफलक (चहापानापर्यंत) : पाकिस्तान प.डाव 41.1 षटकाअखेर 2 बाद 121 : शान मसूद खेळत आहे 45 (134 चेंडूत 7 चौकार), अबिद अली त्रि.गो. आर्चर 16 (37 चेंडूत 2 चौकार), अझहर अली पायचीत गो. वोक्स 0, बाबर आझम खेळत आहे 52 (71 चेंडूत 9 चौकार), अवांतर 9. गोलंदाजी : आर्चर 9.1 षटकांत 1-22, वोक्स 8 षटकांत 1-14.









