28 वर्षांनी निकाल, सीबीआयचे विशेष न्यायालय सुनावणार निवाडा
वृत्तसंस्था/ लखनौ
बाबरी ढांचा पाडण्याच्या 1992 च्या प्रकरणात प्रतीक्षा लागून राहिलेला निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय आज 30 रोजी जाहीर करणार आहे. या प्रकरणात 32 आरोपी असून त्यात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचा समावेश आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. यादव यांनी 16 रोजी या प्रकरणातील सर्व 32 आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी या प्रकरणातील निवाडा येणार असल्याने त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री जोशी यांच्यासहित उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह तसेच खासदार साक्षी महाराज, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे. उमा भारती आणि कल्याण सिंह यांना सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वेगवेगळय़ा रुग्णालयात दाखल केले आहे. निकालाच्या वेळी ते न्यायालयात हजर असतील की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाच हा ढांचा पाडण्यात आला. गेल्या वषी सप्टेंबरमध्ये झालेल्या या प्रकरणातील सुनावणीस ते उपस्थित होते. राम मंदिर निर्माण ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे देखील या प्रकरणातील एक आरोपी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाला हा खटला 31 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या 22 ऑगस्ट रोजी ही मुदत एका महिन्याने वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयात दररोज या खटल्याची सुनावणी झाली. सीबीआयने या प्रकरणात 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर केले. या प्रकरणात एकूण 48 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी 17 जणांचा खटल्याची सुनावणी चालू असलेल्या काळात मृत्यू झाला.
निर्दोष असल्याचा दावा, काँग्रेस सरकारवर आरोप
या प्रकरणात न्यायालयात हजर झालेल्या सर्व आरोपींनी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारवर आरोप करताना त्यांच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप द्वेषपूर्वक नोंदविले गेले असल्याचा दावा केला होता. लालकृष्ण अडवाणी यांनी 24 जुलै रोजी सीबीआय न्यायालयात सर्व आरोप फेटाळून लावताना ते पूर्णपणे निर्दोष आहेत आणि राजकीय कारणांमुळे त्यांना या प्रकरणात ओढले गेले आहे असा दावा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदर मुरली मनोहर जोशी यांनीही न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. कल्याण सिंह यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारने राजकीय सुडाच्या भावनेने प्रेरित होऊन आपल्याविरुद्ध खटला दाखल केला होता, असा दावा 13 जुलै रोजी न्यायालयात केला होता. आपल्या सरकारने अयोध्येतील ढांचाची त्रिस्तरीय सुरक्षा सुनिश्चित केली होती, असाही दावा त्यांनी केला होता.
जामीन घेणार नाही : उमा भारती
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी बाबरी विध्वंस प्रकरणाचा संदर्भ घेऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले असून निर्णय काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही, परंतु काहीही झाले, तरी आपण जामीन घेणार नाही, असे म्हटलेले आहे. आरोपींपैकी एक असलेले उन्नाव येथील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी तुरुंगात जावे लागले, तरी आपण हसत-हसत पुष्पमाला घालून जाईन, अशी प्रतिक्रिया निवाडय़ाच्या आदल्या दिवशी व्यक्त केली आहे.
6 डिसेंबर, 1992 रोजी बाबरी ढांचा पाडण्यात आला होता. त्यानंतर देशभर दंगल उसळली होती. 27 ऑगस्ट, 1993 रोजी उत्तर प्रदेश सरकारने ढांचा प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे दिली होती. या प्रकरणाची सुनावणी लखनौच्या जुन्या उच्च न्यायालय इमारतीत चालली होती. सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल 2017 रोजी या खटल्याची दैनंदिन सुनावणी करावी आणि या खटल्याची सुनावणी घेणाऱया न्यायाधीशांची बदली होणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता निवाडय़ाची वेळ आली आहे.









