जिल्हावासियांचे साकडे, दहा दिवसांच्या घरगुती, सार्वजनिक गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन
प्रतिनिधी/रत्नागिरी, चिपळूण
कोरोनाचे संकट कायमचं दूर कर बाप्पा, आणि पुढच्या वर्षी लवकर वाजत गाजत ये बाप्पा, असे साकडे घालत जिल्हावासियांनी अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाला निरोप दिला. जिल्हय़ात दहा दिवसाच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे ठिकठिकाणी कोणताही गाजावाजा न करता शांततेत विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरी शहरात मांडवी, भाटय़े, कर्ला येथे घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजल्यापासून गणेशभक्तांनी विसर्जनाला सुरूवात केली. अनेकांनी आपल्या कारमध्ये तर अनेकांनी हातगाडय़ा सजवून गणपती बाप्पाला निरोप दिला. रत्नागिरी शहरातील मांडवी धक्क्यावर निर्माल्य संकलनासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी दरवर्षीप्रमाणे गणेशभक्तांचा महापूर नव्हता, कोरोना निर्बंधामुळे मिरवणुका न काढता , कोणताही गाजावाजा न करता भक्तांनी आपल्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला.
तालुक्यातील मालगुंड परिसरात अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवलेल्या घरगुती गणपतींचे मोठय़ा उत्साहात गणपतीपुळे खाडीकिनारी व मालगुंड येथील गायवाडी समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी ’गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
राजापूर तालुक्यातील सुमारे 6 हजार 500 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रविवारी दुपारपासून शहरातील भक्तांनी गणेशमूर्तींसह बाजारपेठ मार्गे विसर्जन घाट गाठले. यावेळी मिरवणुक, ढोल ताशांचा गजर, भजनांचे मेळ, गुलालाची उधळण या सर्वाना फाटा देण्यात आला.
चिपळुणात घरगुती सुमारे 4 हजार व खेर्डीचा राजा, खेर्डी बाजारपेठ, चिपळूण नगर परिषद, भाजी मंडई, कोकण रेल्वे, राहुल गार्डन, बहाद्दूरशेख नाका कोकणचा राजा, वडनाका तसेच चिपळूण राजा आदी 9 सार्वजनिक गणशोत्सव मंडळांच्या गणरायांचा समावेश होता.
खेडमध्ये 17 पैकी 9 गणेशमूर्तींसह 2112 घरगुती गणरायाला अनंत चतुर्दशीदिनी निरोप देण्यात आला. येथील जगबुडी, नारिंगी, चोरदसह ग्रामीण भागातील नद्या व डोह तसेच वाशिष्ठी नदीपात्रात कोरोना निर्देशांचे पालन करून बारा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दापोली तालुक्यातील 2 हजार 421 गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन करण्यात आले.
गुहागर तालुक्यातील 4350 घरगुती व शृंगारतळीतील श्री निळकंठेश्वर उत्सव मंडळाच्या एका सार्वजनिक श्री गणेशाला श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. गुहागर, शृंगारतळी, आबलोली, हेदवी, वेळणेश्वर, कोतळूक, तळवली, पालशेत, पडवे, तवसाळ आदी भागात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.









