वार्ताहर / देवराष्ट्रे
मोहित्यांचे वडगाव ता.कडेगाव येथील संतोष शंकर शिंदे वय ३५ याला त्याच्याच वडिलांनी डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केले. हि घटना दि.१४ रोजी रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. याबाबत आरोपी शंकर रामचंद्र शिंदे वय ७६ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी जखमी संतोष शिंदे हा वारंवार त्याचे वडील शंकर शिंदे यांच्याकडे घर व शेत जमिनीची वाटणी मागत होता. रविवारी रात्री ९ वाजता आरोपी शंकर शिंदे यांच्या घरासमोर तो आला व घर ,शेत जमिनीच्या वाटणी देण्याच्या कारणावरून आई वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी वडील शंकर व मुलगा संतोष यांच्यात वादावादी झाली. यावेळी संतोष याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे रागाच्या भरात वडील शंकर यांनी संतोषच्या डोक्यात फरशी घातली यामध्ये संतोष गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर आरोपी शंकर शिंदे यास कडेगाव येथील न्यायालयात हजार केले असता त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.








