प्रतिनिधी/ सातारा
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला 800 च्या पटीतील बाधित वाढीचा रतीब रविवारी अहवालात थांबला आहे. 666 जणांचा अहवाल बाधित आला तर 14 बाधितांचा मृत्यू झाला. बाधित वाढ मंदावल्याचा, मृत्यूदर घटल्याचा दिलासा मिळत असताना सायंकाळी सहा ते सात दिवसांनी कोरोनामुक्तीची मोठी संख्या 1,692 ही कोरोना विरुध्दच्या लढाईला बळ देवून गेली आहे. दरम्यान, जिल्हय़ात लॉकडाऊनला प्रचंड विरोध होवू लागला असून पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रचंड नाराजी व्यक्त होवू लागली आहे.
लॉकडाऊनला विरोध वाढू लागला
संपूर्ण जिल्हाभरातील नागरिकांचा लॉकडाऊनला विरोध वाढू लागला असून व्यापाऱयांच्या संघटना, विक्रेत्यांच्या संघटना तसेच राजकीय पक्षांकडून जिल्हाधिकाऱयांना निवेदने देवून नो लॉकडाऊनचा नारा नागरिक देवू लागले आहेत. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नागरिकांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र, जिल्हय़ातील मंत्रीमहोदयांसह जिल्हाधिकाऱयांनी यावर अद्याप काहीही भाष्य केलेले नाही.
पोलिसांच्या कारवाईवर प्रचंड नाराजी
एकतर लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झालेले आहेत. तर विक्रेते, दुकानदार, व्यावसायिकांना व्यवसायातील अस्थिरतेचा आर्थिक फटका बसलेला आहे. अशातच जिल्हा प्रशासन दर आठवडय़ाला नवीन नियम काढत असल्याने त्याचा अर्थ लावत बसण्यात दोन दिवस जातात तोपर्यंत नवीन आदेश निघालेला असतो. आता आरटीपीसीआरच्या पॉझिटिव्हीटीच्या दरानुसार लॉकडाऊन लादण्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये असताना पोलिसांकडून रस्त्यावर अडवून दंड वसुली सुरु असून एखादे दुकान उघडे दिसले की पोलीस दुकानात घुसून दंड करत आहेत. याबाबत एका पोलीस कर्मचाऱयाने नाव न घेण्याच्या अटीवर आम्हाला कारवाई करुन दंड वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे सांगितले आहे. ही कारवाईची दहशत व वसुली पोलीस थांबवण्याची गरज आहे.
वेग थोडा मंदावला ः 666 बाधित
रविवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. कराड 184 (29,037), सातारा 173 (41,245), खटाव 65 (19,936), वाई 54 (12,894), पाटण 49 (8748), कोरेगाव 34 (17,152), माण 33 (13,340), फलटण 29 (28,694), खंडाळा 18 (11,992), महाबळेश्वर 18 (4,324), जावली 5 (8,705) व इतर 4 (1,384) असे आजअखेर एकूण 1,97,451 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृत्यूदरात घट ः 14 बाधितांचा मृत्यू
रविवारी अहवालानुसार मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. फलटण 6 (457), पाटण 1 (298), सातारा 1 (1227), कराड 1 (881), खंडाळा 1 (152), खटाव 2 (463), कोरेगांव 1 (376), जावली 0 (181), माण 0 (279), महाबळेश्वर 0 (84), वाई 0 (302) व इतर 1 (68), असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 4,768 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्ती एक लाख 84 हजार पार
जिह्यात आजमितीस एकूण बाधितांची संख्या 1 लाख 97 हजार 451 झालेली आहे. यामध्ये 4 हजार 768 जणांचा मृत्यू झालाय मात्र एकूण कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 84 हजार 369 एवढी दिलासादायक झालेली असून सोमवारी सायंकाळी 1 हजार 692 जणांनी कोरोनावर मात करत लढाईला बळ दिलेले आहे. गेल्या चार ते पाच दिवसानंतर कोरोनामुक्तीचा वेग सोमवारी वाढला असून त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्ण संख्येचा चढता आलेख खाली घसरला आहे. आजमितीस 8 हजार 813 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जिल्हय़ात आहे.








