देशात मृतांचा आकडा वाढत असल्याने भीती कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य सरकारांकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी कोरोनाच्या प्रादुर्भावाला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. शनिवारी देशात 3.92 लाख नव्या बाधितांची नोंद झाली असून 3.07 लाख रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. शुक्रवारच्या तुलनेत नव्या बाधितांची संख्या घटल्यामुळे आणि बरे होणाऱयांचे प्रमाण वाढल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र, दुसरीकडे मृतांच्या आकडय़ात कोणतीही घट होताना दिसत नाही. शनिवारी दिवसभरात 3 हजार 689 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. दरम्यान, देशात आतापर्यंत लसींचे 15 कोटी 68 लाख 16 हजार 031 इतके डोस लाभार्थींना देण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 92 हजार 488 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 3 लाख 92 हजार 488 कोरोनाबाधित आढळून आले. तर 3 हजार 689 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात याच कालावधीत 3 लाख 7 हजार 865 हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. शुक्रवारी देशात नव्या बाधितांचा आकडा 4 लाखांच्या वर पोहोचला होता. तर बरे होणाऱयांची संख्याही तीन लाखांच्या किंचित खाली होती.
देशात सध्या 33 लाख 49 हजार 644 रुग्ण सक्रिय असून ते वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या 2 लाख 15 हजार 542 हजार एवढी झाली आहे. महाराष्ट्रात शनिवारी 802 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 हजार 282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के एवढा आहे. 61 हजार 326 रुग्ण बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 39 लाख 30 हजार 302 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 84.24 टक्के आहे. देशभरात आतापर्यंत 1 कोटी 59 लाख 92 हजार 271 जणांनी कोरोनावर मात केली असून 2 लाख 15 हजार 542 जणांचा बळी गेला आहे. तसेच देशात एकंदर बाधितांचा आकडा आता 1 कोटी 95 लाख 57 हजार 457 पर्यंत पोहोचला आहे.