प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या पंधरवडय़ात रोज 300 ते 400 अहवाल पॉझिटिव्ह येत होते. सोमवारी जिल्हय़ातील 149 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या 331 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या दुप्पट आहे.
सोमवारी 149 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. कडोली, चिकोडी, अथणी, बेळगाव, बैलहोंगल येथील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार मृतांची एकूण संख्या 189 वर पोहोचली आहे.
यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 43 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांपेक्षा सोमवारी ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात 30 तर शहरी भागात 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून हालभावी येथील आयटीबीपीच्या चार जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कुडची पोलीस स्थानकातील दोन पोलिसांनाही कोरोना
कुडची पोलीस स्थानकातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 331 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले. जिल्हय़ातील बाधितांची एकूण संख्या 12 हजार 244 इतकी आहे. तर 9 हजार 57 जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
1 हजार 905 अहवालांची प्रतीक्षा
सध्या 2 हजार 998 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 1 हजार 905 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ात 2 हजार 766 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. कोरोना बळींचा सरकारी आकडा 189 इतका असला तरी प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा आहे.
सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी अद्याप सरकारी नियमांचे पालन होत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणाऱयांची संख्या कमी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश असूनही सरकारी यंत्रणांनी ही कारवाई बंद केली आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.









