प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात कोरोना संसर्गाचे आकडे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात रूग्णसंख्या पुन्हा हजारावर गेली आहे. सलग दोन दिवस सुट्टय़ांमुळे कोरोनामुक्तीही घटली आहे. मृत्यूसंख्येत काहीशी घट झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या अहवालात 11978 नमुने तपासण्यात आले असून यात 1012 रूग्ण बाधित आढळले आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट 8.45 टक्के इतका आहे.
कराडला वाढ कायम; 267 नवे रूग्ण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1012 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात सर्वाधिक 267 रूग्ण कराड तालुक्यात नोंद झाले आहेत. तर सातारा दुसऱया क्रमांकावर आहे. फलटण आणि खटावमध्येही शंभरावर रूग्ण आढळले आहेत.
सात तालुके दोन आकडय़ात
जिल्हय़ातील उर्वरित सात तालुक्यात रूग्णसंख्या नियंत्रणात असून या तालुक्यात दोन आकडय़ात रूग्ण वाढत आहेत. रूग्णसंख्या तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे-जावली 15 (9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगाव 71 (18312), माण 76 (14134), महाबळेश्वर 10(4446) पाटण 12 (9351), फलटण 138 (29851), सातारा 188 (43144), वाई 63 (13800) व इतर 5 (1567) असे आजअखेर एकूण 210904 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
साताऱयात 4 जणांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात 14 बाधितांचा मृत्यू झाला असून सातारा तालुक्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 0 (191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1 (500), कोरेगाव 0 (396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0 (316), फलटण 1 (492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71) असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सुट्टय़ांमुळे डिस्चार्ज घटला
आषाढी आणि बकरी ईदमुळे सलग दोन दिवस सुट्टय़ा आल्याने कोरोनामुक्तीवर परिणाम झाला आहे. बुधवारी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 176 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
बाजारपेठा, रस्त्यांवरील गर्दी कमी होईना
कडक निर्बंध असले तरी पोटापाण्याचा, रोजगाराचा प्रश्न जिल्हावासियांना भेडसावत आहे. त्यामुळे लोक निर्बंध असतानाही घराबाहेर पडत आहेत. परिणामी गर्दीचा माहोल कायम आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास गर्दी कारणीभूत असतानाही लोक गर्दी करताना दिसत आहेत. जिल्हय़ातील संसर्ग कमी करण्यासाठी सातारा आणि कराड तालुक्यातील रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.








