अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 12 मे, सकाळी 11.30
● जिल्ह्यात 2001 नवे रूग्ण वाढले ● अल्पकाळ ठरला एक दिवसाचा दिलासा ● एकूण रूग्ण संख्या 1 लाख 29 हजारावर ● रेमडिसिवरच्या काळाबाजार रोखायला हवा ● संपुर्ण जिल्हाभर धडक मोहिम गरजेची ● सातारा, कराड, फलटणला रेमडिसिवीरसाठी धावाधाव ● विनाकारण फिरणारांवरील कारवाईत ढिलाई
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने प्रत्येक तालुका चिंतेत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कोरोना रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची जिवाच्या आकांताने धडपड सुरू असतानाच रेमडिसिवीर इंजेक्शनच्या प्रकरणांनी माणुसकीला काळिमा फासला आहे. फलटण येथे रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड होऊन काही तास होत असतानाच सातारा येथेही रेमडिसिवीरचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला. हे फक्त फलटण, सातारा येथेच होत नसून प्रशासनाने जिल्हाभर धडक मोहिम राबवून काळाबाजार करणारांचे चेहरे उघड करायला हवेत अशी संतप्त प्रतिक्रिया रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडूून व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2001 रूग्णवाढ झाली असून एकूण रूग्णसंख्येचा आकडा 1 लाख 29 हजार 197 वर पोहचला आहे. सोमवारी एकदम घटलेल्या रूग्णवाढीने पुन्हा धक्कादायक उसळी घेतली आहे.
रूग्णसंख्या दोन हजारावर स्थिर
1 एप्रिल 2021 पासून जिल्ह्यात रूग्णवाढीने कमालीचा जोर धरला. 15 एप्रिल नंतर अपवाद वगळता रूग्णवाढ दोन हजारांच्यावर वाढत आहे. गेल्या सात दिवसातील आढावा घेतला असता 6 मे रोजी 2,292 रूग्ण वाढले. 7 मे रोजी रूग्ण संख्या सुमारे दोनशेने कमी होऊन 2028 पर्यंत आली. 8 मे रोजी पुन्हा वाढ होऊन रूग्णसंख्या 2379 वर पोहचली. 9 मे रोजी 2334 रूग्ण वाढले तर 10 मे रोजी 2280 रूग्णवाढ झाली. कडक लॉकडाऊनच्या काळात दोन हजारावर स्थिर झालेली ही आकडेवारी 12 मे रोजी 700 ते 1000 ने कमी होऊन 1621 वर आली. मात्र कमी झालेली या रूग्णसंख्येचा दिलासा अल्पकाळाचा ठरला. गेल्या 24 तासात पुन्हा 2001 रूग्णांची भर पडली.
18+ वरील नागरिकांचे लसीकरण थांबणार की मंदावणार
सातारा जिल्ह्यासह राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्यात आत्तापर्यंत १ कोटी ८४ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. आता ४५ वयोगटापेक्षा अधिकसाठी केवळ ३५ हजार लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेले ३ लाख डोस ४५ वर्षावरील व्यक्तींना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी काल दिली आहे. ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देणं महत्त्वाचं आहे. केंद्राकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे 18+ वरील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते थांबवणार की त्याच्या मर्यादा कमी करून ते मंदावणार यावर आज निर्णय होऊ शकतो. सातारा, कराड, फलटणसह जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे लस उपलब्ध नसल्याने बंद पडली आहेत. त्यामुळे जिल्हावासियांचे आजच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 6,09,586 एकूण बाधित 1,27,196 एकूण कोरोनामुक्त 101,146 मृत्यू 2,962 उपचारार्थ रुग्ण 25,043
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 2001, मुक्त 1,072, बळी 45









