अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 11 सप्टेंबर 2021, सकाळी 11.00
● 202 जणांचा अहवाल बाधित
● बाप्पांच्या आगमनाने दिलासा
● तपासण्यांचा वेग झाला कमी
● सातारा तालुक्यात 100 च्या पटीत वाढ
● मृत्यू दर आणि मुक्तीदरही घटला
● शाळा सुरू होण्याची गुरुजीना धास्ती
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात बाप्पांचे आगमन अतिशय साध्या पध्दतीने झाले असून, त्यांच्या आगमनाच्या दिवशी जिल्हावासीयांना मोठा दिलासा लाभला आहे. चार महिन्यानंतर प्रथमच बाधित वाढीचा आलेख तीनशेच्या खाली घसरला असून, केवळ 202 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. एकूण 6 हजार 944 जणांचे swab तपासणी करण्यात आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.91 वर आल्याचा दिलासा आहे. मात्र, दररोज होणाऱ्या 13 हजार टेस्टचा आकडा एकदम निम्यावर आला असून याचे गौडबंगाल काय?,असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्याच्या हालचाली असल्याने त्याची धास्ती शिक्षकांनी घेतली आहे.
नियम पाळून बाप्पांचे आगमन
सलग तीन वर्षे गणेशोत्सव हा साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. पूर आणि गतवर्षीपासून आलेला कोरोना. यावर्षी ही कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गणेशोत्सव मंडळाना सक्त सूचना दिल्या होत्या. राज्य शासनाने दिलेली नियमावली पाळत शुक्रवारी बाप्पांचे साधेपणाने आगमन झाले. कुठेही ढोलताशा वाजला नाही, कुठे लेझीम डाव पडला नाही. अगदी साध्या पध्दतीने बाप्पांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. सायंकाळी उशिराची आरती ही मोजक्याच कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पाळून केली. कोरोनामुळे काही मंडळानी प्रतिष्ठापना न करता केवळ सामाजिक कार्य करण्यावर जोर दिला आहे. दरम्यान, जे मंडळ नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत.
तपासण्या निम्याने झाल्याचे गौडबंगाल?
सातारा जिल्ह्यात दररोज सुमारे 13 हजारच्या आसपास तपासण्या केल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातली लॅब बंद झाली होती. त्या दिवशी निम्याने तपासण्या झाल्या होत्या. काल ही बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी 6 हजार 944 जणांच्या तपासण्या झाल्या असून निम्याने तपासण्या झाल्या आहेत. त्यामुळे तपासण्या कमी झाल्या की कुठे बिघाड झाला याचे गौडबंगाल काय?,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सातारा तालुका अजूनही 100 च्या पटीत
सातारा तालुक्यातील बाधित संख्या ही दररोज अजून ही 100 च्या पटीत आढळून येत आहेत. जिल्ह्यातल्या इतर 10 तालुक्यात बाधित संख्या कमी होऊ लागली आहे. खटाव आणि फलटण हे दोन तालुके 50 च्या पुढे तर इतर तालुक्यात 50 च्या आत आहेत. त्यामुळे जिल्हावासीयाना दिलासा मिळू लागला आहे. सातारा तालुक्यात लसीकरण ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तरीही दररोज बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही 100 च्या पटीत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार हे प्रयत्न करत आहेत.
मुक्ती आणि मृत्युदर कमी
कोरोना मुक्त झालेले हे जिल्ह्यात बाधित आढळून येणाऱ्यांच्या निम्याने आहेत. त्यामुळे कोरोना मुक्ती कमी का होत आहे?, प्रशासनात उणीव तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच दिलासादायक म्हणजे म्हणजे जिल्ह्यातील मृत्युदर हा घटू लागला आहे. मृत्युदर जिल्ह्यात कमी झाला असून दररोज दोन ते तीन जणांचा अजून ही बळी जात आहे.
शाळा सुरू होण्याची शिक्षकांना धास्ती
गेल्या 16 महिन्यापासून शाळांना टाळा लागला आहे. हा टाळा पहिल्या लॉकडाऊन वेळी बाहेरगावाहून आलेल्या ग्रामस्थांना कोरोनाटाईन कक्ष केले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये विलीगिकरण कक्ष केले होते. शाळा बंद असल्या तरी शिक्षण हे ऑन लाईन सुरू होते. खाजगी शाळामध्ये ऑन लाईन शिक्षण जोरदारपणे सुरू तर सरकारी शाळांमध्ये पालकांची एवढी परिस्थिती नसल्याने स्मार्ट फोन वर शिक्षण देणे काहींना जमत होते. त्यातून ही काही शिक्षक वेगवेगळ्या संकल्पना लढवत होते. त्यातून काही शिक्षक हे शाळेवर जात ही नव्हते. आता जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षकांच्याकडून माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे पालकांएवजी शिक्षकांनाच शाळा सुरू करण्याची धास्ती लागून राहिली आहे. दरम्यान, एका तालुक्यातील एका शाळेतले चार शिक्षक बाधित झाल्याचा त्या तालुक्यात मोठा गाजावाजा सुरू आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमूने – 19,15,171
एकूण बाधित –2,44,203
घरी सोडण्यात आलेले- 2,31,728
मृत्यू -6014
उपचारार्थ रुग्ण–9098