23 ते 29 मार्च 2022 पर्यंत
नमस्कार. सर्वप्रथम ज्यांचे नाव राकेश आहे त्यांची माफी मागतो. इथे राकेश म्हणजे राहू, केतू आणि शनी! हे तीन ग्रह आपली राशी या एप्रिलमध्ये बदलतील. 12 एप्रिलला दुपारी 12.47 वाजता राहू मेष राशीत आणि केतू तूळ राशीत प्रवेश करेल तर शनी 29 एप्रिलला सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. तुम्हाला माहीत आहे की, मी सहसा ग्रहांबद्दल लिहीत नाही. माझे विषय हटके असतात! आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद देता. मग मी आज ग्रहांबद्दल का लिहितोय? तर काही ज्योतिषी याच 3 ग्रहांची भीती लोकांना घालतात. ‘तुला साडेसाती लागेल.’ ‘तुझी पनवती सुरू आहे’, ‘तुला कंटक शनी आहे,’ ‘तुला ग्रहणदोष आहे’ वगैरे वगैरे. लोक घाबरतात आणि मग ही शांती कर ती शांती कर, अमुक जागी जाऊन ये वगैरे प्रकार चालतात. आपल्याला या सगळय़ापासून वाचायचे आहे, दूर रहायचे आहे. मुळात लक्षात घ्या की, नक्षत्रे ही स्थिर आहेत आणि ग्रह हे फिरत असतात. शनी अडीच वर्षांनी रास बदलतो तर राहू केतूला 18 महिने लागतात. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात कितीतरी वेळा ग्रहांनी रास बदललेली असेल. मग घाबरायचे कशाला? आणि एक मुद्दा लक्षात घ्या की, हे कलीचे युग आहे. गुरुसारख्या देवांच्या गुरुपेक्षा राक्षसांचा गुरु शुक्र आणि राहुचा प्रभाव आज जास्त आहे. जरा एका वेगळय़ा नजरेने आपल्या समाजाकडे बघा. जो तो पैशाच्या, समृद्धीच्या, ऐहिक सुखाच्या, विषयवासनेच्या, भोगविलासाच्या, मायेच्या मागे लागला आहे. पवित्रता, शुचिता, नीतिमत्ता, खरे धार्मिक आचरण याचे पालन करणारे किती लोक आहेत? दुसरा मुद्दा, झुकरबर्गपासून अंबानीपर्यंतच्या सगळय़ा अब्जाधीशांच्या कुंडल्या बघितल्या तर त्यांना अमाप पैसा शुक्र आणि राहूसारख्या ग्रहांनीच दिला आहे. त्यामुळे हे जे तीन ग्रह राशी बदल करत आहेत त्यांच्या नकारात्मक बाजूपेक्षा त्यांचा सकारात्मक परिणाम कसा साधता येईल ते बघूया. एक लक्षात घ्या. राहू म्हणजे आपण सध्या करतो ते कर्म. शनि म्हणजे आपण पूर्वी करून ठेवलेले कर्म आणि केतू म्हणजे आपण सध्याचे भोगतोय ते प्रारब्ध. म्हणजे या त्रैराशिकाला आपण बदलू शकतो! पाऊस जरी नाही थांबवता आला तरी छत्री घेऊ शकतोच ना? पुढच्या लेखात यांचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम आणि उपाय सांगतो. शुभम् भवतु.
महाउपायः परीक्षांचे दिवस चालू आहेत पालकांना नेहमी असे वाटते की आपली मुले नीट अभ्यास करत नाहीत त्याकरता एक उपाय सांगतो. उपाय शक्यतो अमावास्येला करायचा. नाही जमले तर शनिवारी रात्री करू शकता. तीन हळकुंड घ्यायचे. त्यावर मोहरीच्या तेलाचे तीन थेंब लावायचे. त्या तेलाच्या थेंबांवरती काजळाचे तीन ठिपके लावायचे. त्यावर थोडे काळे तीळ लावायचे. मुलाच्या डोक्यावरून ‘अँटी क्लॉकवॉईज’ तीन वेळेला फिरवून हे तीन हळकुंड घराच्या पश्चिमेला फेकून द्यायचे.
सोपी वास्तु टीपः नैर्त्रुत्य दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा संध्याकाळी लावावा. याने पितर संपुष्ट राहतात आणि घरात शांतता नांदते.
मेष
तब्येतीची उत्तम साथ राहील. कुटुंबीयांसोबत वाद संभवतात. धनप्राप्ती करता जास्त कष्ट करावे लागतील. प्रवासामध्ये त्रास होऊ शकतो. कोणतीही धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वाहन चालवताना सावध असावे. भाग्याची उत्तम साथ आहे. वैवाहिक जीवन समाधानकारक. उपाय-कामावर जाताना 3 लवंगा खिशात ठेवाव्यात.
वृषभ
कुपथ्य करणे टाळावे. परिवारातील एका सदस्यामुळे मनस्ताप संभवतो. छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. जमिनीसंबंधी व्यवहार पुढे ढकला. प्रेमी जनांकरता काळ शकतो. मित्रांमुळे आर्थिक नुकसान संभवते. उपाय-देवीच्या मंदिरामध्ये दोन केळी, बतासे आणि हिरवे कापड अर्पण करावे.
मिथुन
खाण्यापिण्याच्या सवयीमुळे तब्येतीवर परिणाम होईल. आर्थिक लाभ उत्तम असेल. मित्रांचा सहयोग मिळेल. धनप्राप्तीचे उत्तम योग आहेत. प्रवास टाळावा. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कलाकार आणि खेळाडूंना अनुकूल काळ आहे. गुप्त शत्रूंच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे. सावध रहावे. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. उपाय-सोमवारी शिवपिंडीवरती अशोकाच्या झाडाची पाने अर्पण करावी.
कर्क
बरेच दिवस मनात रेंगाळणारी एखादी योजना वास्तवात आणण्याचा प्रयत्न कराल. तब्येत ठीकठाक राहील. कुटुंबीयांसोबत वाद संभवतो. प्रवासाचे योग आहेत. मातेचे सहकार्य लाभेल. छोटय़ा गुंतवणुकीमधून फायदा होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नोकरदारांना कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भाग्याची साथ कमी आहे म्हणून कष्टाचे प्रमाण वाढवावे. समाजात मान मिळेल. उपाय-रात्री चंद्रपूजन करावे.
सिंह
मागील काही दिवसात केलेल्या कुपथ्याचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. परिवारातील वातावरण चांगले राहील. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाहनखरेदीचे योग आहेत. जमिनीच्या व्यवहाराकरता उत्तम काळ आहे. प्रेमीजन एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतील. शेअर्समध्ये लाभ होईल. नोकरदारांना जास्त कष्ट करावे लागतील. वैवाहिक जीवनात तणाव असेल. लांबच्या प्रवासाचा बेत आखू शकता. खर्चाचे प्रमाण वाढेल. उपाय- सिंहारुढ देवीला लाल वस्त्र अर्पण करावे.
कन्या
आरोग्य उत्तम असेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. येणी वसूल होतील. प्रवासातून लाभ होईल. वाहन सुख उत्तम असेल. एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न कराल. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी सावध असावे. चुका होऊ शकतात. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. वाहन चालवताना सावध असावे. लाभाचे योग आहेत. उपाय- तृतीयपंथी व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा.
तुळ
पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत आणि त्यातून लाभ होईल. आईच्या सल्ल्यामुळे फायदा होईल. धोकादायक गुंतवणूक करण्यापासून दूर रहावे. कोणालाही उधार पैसे देऊ नये. गुप्तशत्रूंच्या कारवाया कमी होतील. नोकरदार वर्गाला काळ प्रतिकूल आहे. जोडीदारामुळे फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. उपाय- पिंपळाच्या पानावर मधाचे बोट लावून ते पान शिवलिंगावर अर्पण करावे.
वृश्चिक
मनातील इच्छा पूर्ण होतील. तब्येतीची काळजी मिटेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मनोरंजनाकरता प्रवास कराल. जमिनीचे व्यवहार करत असताना सावध रहावे. वाहन दुरुस्ती येऊ शकते. प्रेमीजनांना काळ प्रतिकूल आहे. नोकरीत कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात ताण असेल. भाग्य अनुकूल होत आहे. उपाय- गणेश मंदिरात तमालपत्र अर्पण करावे.
धनु
कष्टाचे चीज होईल. महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. तब्येतीची साथ मिळेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. प्रवास टाळावा. जमिनीचे व्यवहार किंवा वाहन खरेदी टाळावी. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ मिळेल. प्रेमीजनांकरता अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये सहकाऱयांची मदत मिळणार नाही. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. महत्त्वाची बातमी कळेल. प्रति÷ssमध्ये वाढ होईल. उपाय- गाईला गूळ चारावा.
मकर
तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतील. कुटुंबात वाद संभवतो. पैसे वाचवण्याकडे कल असेल. भावंडांशी वाद संभवतो. स्थावर संपत्तीच्या दृष्टीने चांगले योग आहेत. प्रेमीजनांनी वाद टाळावा. नोकरीमध्ये मनस्ताप होईल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. तीर्थयात्रा घडू शकते. अडलेली कामे होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. दूर ठिकाणाहून लाभाचे संकेत मिळतील. उपाय- कच्च्या जमिनीवरती नऊ थेंब तिळेल टाकावे.
कुंभ
आरोग्याची काळजी न घेणे महागात पडू शकते. कुटुंबातील वाद बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध असावे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. धोकादायक गुंतवणूक टाळण्यामध्ये शहाणपणा आहे. प्रेमीजनांनी वावगे वागू नये. नोकरदारवर्गाला अनुकूल काळ आहे. जोडीदाराशी टोकाचे मतभेद होऊ शकतात. अचानक धनलाभ होईल. दुर्घटनेपासून सावध रहावे. तुमच्या कार्यामुळे समाजातील तुमचे स्थान उंचावेल. उपाय -काळय़ा गाईची सेवा करावी.
मीन
आरोग्याच्या बाबतीत अत्यंत सावधान राहण्याची गरज आहे. वातविकार किंवा पायाची दुखणी त्रास देऊ शकतात. तुमच्या बोलण्यामुळे लोकांची मने जिंकाल. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. प्रवास करणे टाळावे. छोटे आर्थिक लाभ होऊ शकतात. नोकरीत जास्त कष्ट करावे लागतील. वैवाहिक जोडीदारामुळे बरेच प्रश्न सुटतील. भाग्याची उत्तम साथ आहे. मानसन्मान वाढेल. लाभ होतील. उपाय- गणपतीला दुर्वांची माळ अर्पण करावी.





