प्रतिनिधी / रत्नागिरी
जोपर्यंत शासन 100 टक्के प्रेक्षकांना चित्रपटगृहे पाहण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत चांगले चित्रपट चित्रपटगृहात येणारच नाह़ी त्यामुळे चांगल्या चित्रपटाअभावी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली असल्याची माहिती रत्नागिरीतील चित्रपटगृहाच्या मालकांनी दिल़ी
कोविडचा प्रकोप कमी हायला लागल्यानंतर शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणत चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र चित्रपटगृहे सुरु होऊन जवळपास 2 आठवडे लोटले तरीही चित्रपटगृहांत शुकशुकाट कायम आहे. नवीन चित्रपट आले नाहीत, त्यामुळे प्रेक्षकही चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्याने चित्रपटगृहातील पडदा साडेनऊ महिन्यांपासून पांढराच आहे. लॉकडाऊनकाळात अनेकांना फटका सहन करावा लागला. राज्यातील सिंगल, डबल क्रिन चित्रपटगृहे या काळात बंद करण्यात आली. शिथिलतेनंतर उद्योग व्यवसायांची गाडी हळूहळू रुळावर यायला लागली आहे. मात्र चित्रपटगृहे शिथिलतेनंतरही लॉकडाऊनच असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. चित्रपटांच्या शो दरम्यान 90 टक्के खुर्च्या रिकाम्या राहत असल्याचे निदर्शनास आल्यावर चित्रपटगृह बंद करण्यात आले. आजही शहरातील तीनही चित्रपटगृह बंद असल्याने मालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने चित्रपटगृहाशी सबंधित व्यवसायांवरही परिणाम झाला आहे.
शासनाच्या मदतीची गरज….
लॉकडाऊनपासून आतापर्यंत चित्रपटगृहे बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चित्रपटगृहाची नियमित स्वच्छता, विद्युत देयक आणि कर्मचाऱयांचे वेतन द्यावे लागत असल्याने आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. आता साडेनऊ महिन्यां पासून ही परिस्थिती असल्याने महिन्याभराचा खर्च कुठून भरुन काढावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपटगृह मालकांच्या या समस्येचा विचार करुन शासनाने त्याना मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.
जोपर्यंत शासन 100 टक्के प्रेक्षकांना चित्रपटगृहे पाहण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत चांगले चित्रपट चित्रपटगृहात येणारच नाह़ी त्यामुळे चांगल्या चित्रपटाअभावी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आह़े विद्युत देयक , स्वच्छता आणि कर्मचाऱयांचे वेतन काही लाखांचा प्रतिमहा खर्च आहे . शासनाने शिथीलतेनंतर चित्रपटगृह उघडण्याची परवानगी दिली. गेल्या साडेनऊ महिन्यापासून चित्रपटगृह बंद असल्याने आता दैनंदीन खर्च कसा भागवावा , कर्मचाऱयांचे वेतन कुठून करावे , असा प्रश्न निर्माण झाला आह़े.
प्रकाश चाफळकर, सिध्दीविनायक सिटी सेंटर मल्टीप्लेक्स, रत्नागिरी









