महामुनी शुकदेव व परिक्षिती राजा यांच्या संवादात कृष्ण कथा पुढे उलगडत जाते ती अशी-
म्हणे सर्वज्ञा बादरायणि । प्रश्नापेक्षा अंतःकरणीं ।
वर्ते ते मज विवळ करूनी । घालिजे श्रवणीं स्वामिया ।
हिरण्यकशिपूचा जो कुमर । प्रह्लादनामा वैष्णवप्रवर ।
त्याचा पुत्र विरोचनवीर । वीर्याङुक्र बळि त्याचा ।
बाणासुर बळीचा सुत । शोणितपुरीचा जो नृपनाथ ।
शङ्कराचा परम भक्त । वोळगे संतत शिवसेवे ।
उषानामका बाणतनया । पर्णूनि अनिरुद्धें केली जाया । तेथें शंकरा रुक्मिणीप्रिया । दारुण उभया रण झालें । एकमेकांचे हृदयवासी । घोर युद्ध कैं घडलें त्यांसी । हें सर्वही कथावयासी । योग्य आहेसी योगीशा ।
परिक्षिती राजाने महामुनी शुकदेवांना म्हटले- हे महायोगी, मी असे ऐकले आहे की, यदुश्रे÷ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या ऊषा हिच्याशी विवाह केला होता आणि याप्रसंगी श्रीकृष्ण व शंकराचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले होते. हा वृत्तांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा.
ऐसा नृपाचा ऐकूनि प्रश्न । बादरायणि मुनि सर्वज्ञ ।
करिता झाला निरूपण । तें सज्जन परिसत तूं ।
शुक म्हणे गा भुवनपाळा । परीक्षिति हरिगुणश्रवणशीळा ।
हरिभक्तांची अन्वयमाळा । जे कळिमळा सुरसरिता ।
प्रह्राद भजला गरुडध्वजा । अद्यापि ज्याची कीर्तिध्वजा ।
तत्सुत विरोचन सायुज्या । पातला ओजा रविभजनें ।
विरोचनवीर्यें जन्मला बळि । इंद्र मेळविला जेणें धुळी ।
समस्त त्रिदशांचिये मौळीं । अमरावतीस मिरवला ।
जया बळीची प्रतापगरिमा । त्रिजगीं कोणी न पवे सीमा ।
क्षीराब्धि मथूनि दिव्य ललामा । अद्भुत महिमा प्रकाशिला ।
जयाचे शतमखयजनकाळीं । वामनरूपें श्रीवनमाळी ।
त्रिपादभूदानाच्या छळीं । छळितां न डंडळी सत्वस्थ ।
ब्रह्माङ्गण भरलें द्विपादमात्र । तृतीयपदीं अर्पी गात्र ।
एवं वमन दानपात्र । अर्चूनि वेत्रधर केला ।
तया बळीस शत एक पुत्र । त्यांमाजी ज्ये÷ बाणासुर ।
तेणें आराधिला शंकर । भजनीं तत्पर होऊनी ।
वीर धीर प्रतापी बळी । अमरां अजिंक समरशाळी ।
तेणें तोषवूनि वनमाळी । केला देहलीपरिगोप्ता ।
ऐसा महात्मा बळि प्रसिद्ध । ब्राह्मणभजनें जिंकूनि बिबुध ।
कीर्ति विस्तारिली अगाध । प्रतापी प्रह्राद मानविला ।
महामुनी श्रीशुकदेव म्हणाले- महात्मा बलीची कथा तर तू ऐकलीच आहेस. ज्याने वामनरूपधारी भगवंतांना साऱया पृथ्वीचे दान केले होते, त्या महात्म्या बळीराजाला शंभर मुलगे होते. त्यापैकी सर्वात थोरल्याचे नाव बाण होते.
तया बळीचा औरस कुमर । प्रतपामेरु बाणासुर ।
शिवसेवनीं निरंतर । चंद्री चकोर ज्यापरी ।
प्रमथगणीं वरि÷ मान्य । बुद्धिमंत आणि वदान्य ।
सत्य सन्मार्गीं व्रतस्थ पूर्ण । त्रिजगीं धन्य दैत्यकुळीं । बळीचा औरस पुत्र भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये नेहमी गढून गेलेला असे. समाजात त्याच्याविषयी मोठा आदर होता. त्याचे औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती. स्वत:ची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे. शिवाय तो नि÷sने व्रतपालन करीत असे.
Ad. देवदत्त परुळेकर








