मिकी पाशको यांचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
बाणावली मतदारसंघात आपली स्वताची अशी पाच हजार मते आहे. तेव्हढी मते अन्य कुणाकडे नाही असा दावा काल माजी आमदार मिकी पाशेको यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीला अवघा एक महिना राहिलेला आहे. आपल्याला प्रचारासाठी कमी वेळ मिळत असला तरी आपण गावात जाऊन राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्ती तसेच समाज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपली उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. तो दूर करण्यासाठी आपण बाणावली गट काँग्रेसचे अध्यक्ष मिनीन फर्नांडिस, महिला गट काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती परेरा व अल्पसंख्याक गट काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती शेख यांच्या उपस्थितीत प्रसार माध्यमांतून लोकांच्या समोर जात असल्याचे मिकी पाशेको म्हणाले.
आपण आज बुधवार दि. 12 रोजी बाणावली मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ करीत असल्याची माहिती मिकी यांनी दिली. बाणावली मतदारसंघात प्रत्येक बुथावर आपले संघटन आहे. प्रत्येक बुथावर किमान पाच कार्यकर्ते आपला प्रचार करतील. निवडणूक आयोगाने जी मार्गदर्शन तत्वे घालून दिलेली आहे. तिचे पालन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघात मोठी रॅली काढणे तसेच हजारो लोकांच्या उपस्थित जाहीर सभा घेणे आपल्या शक्य आहे. परंतु, कोविड महामारीमुळे आम्ही या गोष्टी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आज वेगवेगळय़ा बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यात तृणमूल काँग्रेसने, काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्याचे विधान करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. मात्र, काँग्रेस पक्ष, तृणमूलकडे युती करणार नसल्याचा दावा मिकीने केला. तृणमूल काँग्रेसने भाजपचे आमदार नेलेले नाहीत. उलट काँग्रेसचे आमदार नेऊन कुठल्या तोंडाने ते युतीची भाषा करतात असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. तृणमूल काँग्रेसला अदानीचा पाठिंबा असून तृणमूलच्या सहाय्याने भाजपला विजयी करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.









