एचडीएफसी, ऍक्सिस बँक मजबुतीमध्ये- निफ्टीही तेजीत
प्रतिनिधी/ मुंबई
चालू आठवडय़ात तिसऱया दिवशी भारतीय शेअर बाजाराचा प्रवास तेजीमध्ये राहिला आहे. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 1030 अंकांच्या वाढीसह 50,781.69 वर बंद झाला आहे. दिवसभरात निर्देशांकाने 50,881.17 चा टप्पा गाठला होता. मंगळवारी बीएसई निर्देशांक 7 अंकांची काहीशी वाढ नोंदवत 49,751.41 वर बंद झाला होता.
बुधवारच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये सकाळी 11.40 वाजल्यानंतर जवळपास पाच तास तांत्रिक बिघाड राहिल्याचे दिसून आले, यामुळे ट्रेडिंग ठप्प राहिले होते. या कारणामुळे शेअर बाजारातील व्यवहारांची वेळ बुधवारच्या सत्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे या अधिकच्या वेळेत बाजारात जोरदार वाढ राहिल्याचे दिसून आले.
बुधवारी सकाळी 22 अंकांच्या वाढीसोबत निफ्टी 14,729 वर खुला झाला तर सायंकाळी 5 वाजता मात्र 274 अंकांच्या तेजीसोबत 14,982 वर बंद झाला आहे.
बँकांच्या समभागांची सर्वाधिक विक्री
बाजारातील गुंतवणूकदारांनी बँकिंग समभागांची सर्वाधिक खरेदी केली आहे. यामध्ये निफ्टीमधील बँक निर्देशांक जवळपास 1,335 अंकांनी म्हणजेच 4 टक्क्यांच्या वाढीसोबत 36,452.30 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला बीएसई सेन्सेक्समध्ये ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागांनी मात्र 32.10 अंकांची झेप घेतली होती.
60 टक्के समभागांचे भाव वाढले
एक्सचेंजमधील 3,099 समभागांमध्ये व्यवहार झाला, यामधील 1,863 समभाग वाढीसोबत तर 1,068 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. वाढीसोबत लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 204.02 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. मंगळवारी हा आकडा 201.39 लाख कोटींवर राहिला होता. देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 216.67 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.








