किल्ले बनविण्यात बाल मावळे दंग
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी अगदी दहा-बारा दिवसांवर आल्याने बालचमूचे आकर्षण असलेले गड-किल्ले, मावळे, मंदिर आणि प्राण्यांच्या प्रतिकृती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे लहानग्यांची पाऊले किल्ल्यांच्या प्रतिकृतींकडे वळताना दिसत आहेत. दिवाळी म्हटले की मातीचा किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे बाजारात किल्ल्यांच्या प्रतिकृतींना मागणी वाढली
आहे.
धगधगत्या इतिहासाची साक्ष देणाऱया शिवरायांचे रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, राजगड, विशाळगड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात बालचमू दंग झाले आहेत. यासाठी लागणारे किल्ले, शिवाजी महाराजांच्या मूर्ती, मावळे, मंदिर व प्राण्यांच्या प्रतिकृती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, दसऱयाची सुटी असल्याने शहरासह ग्रामीण भागात दिवाळीसाठी किल्ले बनविण्यात बाल मावळे दंग झाले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी बालचमूंमध्ये उत्साह दिसून येत आहे.
दसऱयाच्या सुटीचा उपयोग किल्ले बनविण्यास होत असल्याचे दिसत आहे. गल्लो-गल्ली शिवरायांचे किल्ले साकारले जात आहेत. दिवाळीआधी किल्ले तयार व्हावेत, यासाठी बालचमूंची धडपड पाहायला मिळत आहे. नियोजनबद्ध किल्ले तयार करण्यासाठी बालचमू माती, दगड, विटा, वाळू आणि इतर तुकडय़ांची जमवाजमव करताना दिसत
आहेत.









