सेन्सेक्स 12 अंकांनी प्रभावीत : एशियन पेन्ट्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील तेजीचा प्रवास अखेर सप्ताहाच्या अंतिम दिवशी शुक्रवारी पूर्णत खंडित झाला आहे. मागील सत्रामध्ये मात्र सेन्सेक्स व निफ्टी यांनी तेजीचा माहोल कायम ठेवला असल्याचे दिसून आले. शुक्रवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 12 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. जागतिक बाजाराचा विचार केल्यास यामध्ये नकारात्मक स्थिती राहिल्याने याच दरम्यान देशातील बाजारात काहीसा असणारा तेजीचा कल घसरणीत बदलून बाजार बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 12.27 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 61,223.03 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 2.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 18,255.75 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग 2.66 टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी तसेच भारती एअरटेल यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मात्र शुक्रवारी टीसीएस, इन्फोसिस, लार्सन ऍण्ड टुब्रो, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. सेन्सेक्समधील 18 समभाग नुकसानीसह तर 12 समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील स्थितीमध्ये मात्र आशियातील जपानचा निक्की व दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.3 टक्के नुकसानीसह बंद झाले आहेत. हाँगकाँगचा हँगसेंग व तैवानचे बाजार 0.2 टक्के इतका घसरला होता. चीनमधील शांघाय कम्पोजिटचा निर्देशांक नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपच्या प्रमुख बाजारात दुपारपर्यंत विक्रीचा दबाव राहिला होता. शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थांत्मक गुंतवणुकदारांनी 1,390.85 केटी रुपये मूल्याच्या समभागाची विक्री केली आहे. एकंदर बाजारात आंतरराष्ट्रीय घडामोडीचा दबाव दिसून आला. त्यामुळे बाजाराला तेजीचा प्रवास कायम राखता आला नाही. तरीही बाजार एकदम काही घसरलेला नाही, हे महत्त्वाचे.








