गत सप्ताहातील पाचही सत्रांमध्ये तेजी दिसून आल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांत उत्साहाचे वातावरण राहिले आहे. या पार्श्वभूमीवर चालू आठवडय़ातही चढती भाजणी कायम राहील असे दिसते. तथापि, अमेरिकेत पुन्हा निवडणुका जाहीर झाल्यास बाजारात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे या आठवडय़ात दिवाळीच्या निमित्ताने खूप मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर थोडीशी प्रतीक्षा आणि खूप सावधगिरी गरजेची आहे. अर्थात, ज्याच्यात संयम आहे आणि आर्थिक क्षमता चांगली आहे, त्यांच्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून खरेदीसाठी अनेक चांगले समभाग सज्ज आहेत.
येणाऱया प्रत्येक रात्रीनंतर दिवस असतो, असं म्हटलं जातं. हे वाक्य शेअर बाजारासाठी तंतोतंत लागू पडतं. सरत्या आठवडय़ानं त्याची प्रचिती दिली. तत्पूर्वीच्या आठवडय़ावर नकारात्मकतेचे ढग दाटल्याने बाजारात तीव्र घसरण दिसून आली होती. परंतु गत सप्ताहातील पाचही सत्रांमध्ये बाजाराचा आलेख उंचावत राहिला. तो इतका उंचावला की गेल्या नऊ महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. सप्ताह समाप्तीच्या शुक्रवारच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 553 अंकांनी वधारुन 41,893 अंकांवर बंद झाला; तर निफ्टीनेही 143 अंकांच्या तेजीसह 12,263 वर उडी घेतली. या दिवशी बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा या समभागांत तेजी दिसून आली; तर मारुती सुझुकी, गेल, भारतीय एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंटसच्या समभागात विक्रीला गती दिसून आली. दोन नोव्हेंबर रोजी बीएसईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल 1,57,18,574.96 कोटी इतके होते; ते 6 नोव्हेंबर रोजी सप्ताहअखेरीस 1,63,55,894.4 कोटींवर पोहोचले आहे. म्हणजेच पाच दिवसांत बाजारातील गुंतवणूकदारांची 6.3 लाख कोटींची कमाई झाली. ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर महिन्यातही एफआयआय भारतीय बाजारात पैसा लावत आहेत. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यात सुमारे 8,529.54 कोटींची खरेदी यामार्फत झाली आहे. गतसप्ताहातील या तेजीचे एक कारण अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल आणि त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारांनी केलेले स्वागत. जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, हाँगकाँगचे निर्देशांकही गतसप्ताहात वधारलेले दिसले. दुसरे कारण म्हणजे सौदी अरेबियातील पब्लिक इनव्हेस्टमेंट फंडने रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये 9555 कोटींची घोषणा केल्याने रिलायन्सचे समभाग 3.5 टक्क्यांनी वधारले होते.
आता चालू आठवडय़ाकडे वळूया. मागील आठवडय़ात याच स्तंभामध्ये अमेरिकन निवडणुकानंतर बाजारावर परिणाम करणारा एक घटक कमी होईल, असे म्हटले होते. गतसप्ताहातील तेजीमुळे ते खरे ठरले असले तरी ट्रम्प यांनी न्यायालयात दाद मागितल्यास त्याचे बाजारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यापलीकडे जाऊन काही आंतरराष्ट्रीय जाणकारांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार अमेरिकेत पुन्हा निवडणुका जाहीर झाल्यास बाजारात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे या आठवडय़ात दिवाळीच्या निमित्ताने खूप मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर थोडीशी प्रतीक्षा आणि खूप सावधगिरी गरजेची आहे.
तथापि, बाजारात जर चढतीचा कल दिसून आला तर मात्र अगदी शॉर्ट टर्मसाठी त्याचा फायदा नक्कीच घ्यायला हवा. कारण सध्याच्या तेजीचा सिलसिला पुढे जाऊन दिवाळीत बाजार 12,450 ते 12,500 चा नवा विक्रम प्रस्थापित करेल अशीही शक्यता अनेक जाणकारांनी वर्तवली आहे.
या आठवडय़ात गुंतवणूक करताना दिवाळीच्या काळातील वस्तू, सेवांची विक्रीवर नजर ठेवून त्यानुसार समभाग निवडा. ऑटो कंपन्यांचे समभाग या काळात हमखास वधारतात. त्यामुळे शॉर्टटर्मसाठी त्यांची खरेदी करता येईल. याखेरीज होमअप्लायन्सेसच्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही फायदेशीर ठरतील. दीर्घकाळासाठी डीसीबी बँकेचा समभाग खरेदी करता येईल. साधारण 9 ते 12 महिन्यांचे टार्गेट ठेवावे. या काळात 82 रुपयांचा हा समभाग 105 अंकांवर जाईल. अशाच प्रकारे डिव्हीज लॅबचा 3221 रुपयांचा समभाग सहा महिन्यांत साधारण 4100 रुपयांचे टार्गेट ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज इक्लेरेक्सचा 711 रुपये मूल्य असणारा समभाग 900 रुपयांचे टार्गेट ठेवून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी खरेदी करता येईल. दीर्घकाळासाठी बजाज फायनान्स हा उत्तम समभाग ठरेल. 3768 रुपयांवर असणारा हा समभाग एक वर्षांत 4700 रुपयांवर जाईल असा अंदाज आहे. याखेरीज रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला, इंडसइंड बँक, मैथन अलॉयज्, टीसीएस, नेरोलॅक पेंटस्, एआयए इंजिनिअर्स या समभागांची खरेदीही येणाऱया काळात निश्चित फायदा देणारी ठरेल.
जाता जाता, या आठवडय़ात शनिवारी लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी अनेक दिग्गज शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. ही गुंतवणूक अगदी जुजबी असते; पण मुहुर्त साधण्यासाठी ती केली जाते. ही एक परंपराच आहे म्हणा ना! यंदा 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजल्यापासून 7.15 पर्यंत एक तास ट्रेडिंगसाठी बाजार खुला असणार आहे. आपल्याकडे दिवाळीपासून नववर्षाची सुरुवात होत असते. यानिमित्ताने जर गुंतवणूक करणार असाल तर दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून चांगल्या समभागांची खरेदी करा. यासाठी लार्ज कॅप कंपन्यांना प्राधान्य द्या. जेणेकरुन पुढील दिवाळीपर्यंत तुमच्यासाठी धमाकेदार ठरेल!
– संदीप पाटील









