बाजारभोगाव / वार्ताहर :
शेतकरी संघातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पुरात तेरा टन धान्य भिजून वाया गेले होते. त्यामुळे खराब झालेल्या धान्याची पोती पुरण्यात आली होती. पुरामुळे दयनिय अवस्था झालेल्या गोरगरीबांच्या धान्याची नासाडी केल्याने कर्मचाऱ्यांच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मोर्च्याद्वारे तात्काळ धान्य देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज गुरूवारी रेशनधारकांना धान्य वाटप करण्यात आले. धान्य मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महापुरामुळे अचानक पाणी वाढल्याने व वेळेत वाहन उपलब्ध न झाल्यामुळे रेशनचे धान्य गोडाऊनमधून बाहेर काढता आले नाही. केवळ दोन टन धान्य सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र तेरा टन धान्य भिजले. हे धान्य खाण्यायोग्य नसल्यामुळे पंचनामा करून पुरण्यात आले. त्यावेळचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. रेशनधारकांनी मोर्चा काढून शेतकरी संघाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. युवा नेते आदिश भोगावकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांना नमते घ्यावे लागले होते. त्यामुळे माफी मागून तात्काळ बदली धान्य देणार असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी हा वाद शमवला होता. महसुल विभाग व ग्रामपंचायतीने याबाबत यशस्वी मध्यस्ती केली होती.
बुधवारी सायंकाळीच धान्य आल्याची बातमी कळताच गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास रेशनधारकांनी दुकानासमोर गर्दी केली होती. पुन्हा वाद उफाळून येवू नयेत यासाठी मंडलाधिकारी बी. एस. खोत यांनी धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रेशनधारकांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मंडलाधिकारी बी. एस खोत , तालुका काॕग्रेसाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर , युवराज पाटील , ग्रा.पं, सदस्य अमोल गवळी , माजी पं. स.सदस्य बाबासो पोवार, तलाठी अनिल पर्वतेवार , अमोल कांबळे , सतीश पाटील , सुभाष सावंत , संभाजी कुंभार , मॕनेजर सखाराम पाटील , रघुनाथ गवळी आदी उपस्थित होते.









