बाजारभोगाव /प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव पैकी मोताईवाडी येथील मोताईदेवी मंदिरातून बेपत्ता झालेल्या संपदा नारायण बने (वय ४०) महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी चारच्या सुमाराला कसबा बोरगाव येथील कासारी नदी पात्रात सापडला.
सदर महिला ग्रामदैवत मोताईदेवी मंदिरात नवरात्रकरी म्हणून उपवासाचे व्रत करीत होती. बुधवारी १३ रोजी रस्ता ओलांडून ऊसाच्या शेतात गेलेली प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते मात्र खूप वेळ झाला तरी परत न आल्यामुळे तिचा संपूर्ण ग्रामस्थ, नातेवाईक यांनी नदिकाठचा परिसर पिंजून काढला. नवरात्रकरी महिला गायब झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. अखेर रविवारी दुपारी चारच्या सुमारास बोरगाव गावच्या हद्दीतील म्हारमळा शेतातील नदीपात्रात त्या महिलेचा मृतदेह तरंगत असलेला आढळला. सायंकाळी हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तिच्या अंगावरील दागिने शाबूत असल्याने सदर महिलेने आत्महत्या केल्याच प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . मयत महिलेच्या पश्चात पती , मुलगा , मुलगी असा परिवार आहे.
घटनास्थळी कळे पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रमोद सुर्वे, पोलिस नाईक राहूल पोवार, हवलदार यादव, विक्रम पाटील, मारूती पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पन्हाळा ग्रामीण रूग्णालयात पाठवला आहे. याबाबत बोरगावचे पोलीसपाटील संदीप पाटील यांनी वर्दी दिली आहे.









