क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीगच्या दुसऱया उपान्त्य फर्स्ट लेगमध्ये आज बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड आणि एटीके मोहन बागान आमनेसामने येत आहेत.
या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडने चमकदार घोडदौड केली आहे. सर्व अंदाज चुकवित त्यांनी टीकाकारांनाही गप्प केले आहे. मोसमाच्या मध्यास कामगिरीत घसरण झाल्यामुळे त्यांचे आव्हान मोडीत काढण्यात आले होते, पण खलीद जमील यांच्याकडे सुत्रे आल्यानंतर कामगिरीला कलाटणी मिळाली. आयएसएलच्या इतिहासात दुसऱयांदाच नॉर्थईस्ट युनायटेड संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे.
खलीद जमिल हे प्रशिक्षक म्हणून नऊ सामन्यांत अपराजित आहेत. सहा विजय व तीन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. आता ही मालिका कायम राखण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यशाचे सर्व श्रेय आपल्या खेळाडूंना आहे, असे जमिल म्हणाले. सर्व खेळाडूंनी कसून प्रयत्न केले. त्यांच्यामुळे आम्ही एवढी वाटचाल केली आहे. मी नऊ सामन्यांपूरता विचार करीत नाही, तर अगदी पहिल्या सामन्यांपासून ही प्रक्रिया घडली. कसून सराव करणाऱया खेळाडूंचा प्रशिक्षक असल्याचा मला अभिमान वाटतो, असे जमिल म्हणाले.
आजच्या या सामन्यात समान शैली असलेले संघ आमनेसामने येतील. प्रतिस्पर्ध्याला आगेकूच करण्यासाठी मैदानावर संघटीत स्वरूप ठेवण्यावर त्यांचा भर असेल. नॉर्थईस्ट युनायटेडने जेव्हा आघाडी घेतली आहे, तेव्हा त्यांना पराभूत करणे अवघड ठरले आहे. त्यांनी एकूण तेरा वेळा यंदाच्या स्पर्धेत आघाडी घेतली आणि आठ वेळा विजय मिळविला तर चार वेळा बरोबरी साधली. एटीके मोहन बागानचीही वाटचाल अशीच झाली आहे. चौदा वेळा आघाडी घेतल्यानंतर 12 विजय आणि दोन बरोबरी अशी कामगिरी त्यांनी नोंदविली आहे.
अशावेळी पहिला गोल करण्याचे महत्व जमिल यांना ठाऊक आहे. आम्ही एका चांगल्या संघाविरूद्ध खेळणार आहोत. एटीकेचा बचाव आणि आक्रमणही भक्कम आहे. पहिल्या लेगचा सामना महत्वाचा असल्यामुळे आम्हाला दक्ष राहावे लागेल. हा स्पर्धेतील सर्वाधिक खडतर सामना असेल. त्यामुळे आम्हाला चांगली तयारी करावी लागेल आणि भक्कम खेळावे लागेल, असे जमिल म्हणाले.
नॉर्थईस्ट युनायटेडला इतिहासापासून प्रेरणा घेता येईल. एटीकेच प्रशिक्षक आंतोनिया हबास आयएसएल उपान्त्य फेरीतील पहिल्या लढतीत कधीच यशस्वी ठरलेले नाहीत. तीन लढतींत दोन पराभव व एक बरोबरी अशी त्यांची कामगिरी झाली आहे. ही आमच्यासाठी जमेची बाजू असली तरी आम्हाला दक्ष राहावे लागेल, असे जमिल म्हणाले.
एटीके मोहन बागानची कामगिरी मागील तीन सामन्यांत घसरल्याने त्यांना आयएसएलच्या लीग जेतेपदाला मुकावे लागले. यानंतरही आयएसएल जेतेपदाची त्यांची मोहिम कायम आहे.
नॉर्थईस्ट युनायटेडसाठी हा मोसम चांगला ठरला. ते खडतर प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्याकर्ड बचाव, मध्यफळी आणि आघाडीफळीत चांगले खेळाडू असून ते मैदानावर शंभर टक्के झोकून देत खेळ करतात, असे एटीकेचे प्रशिक्षक हबास म्हणाले.









