महाराष्ट्राचे दिग्गज नेते सर्वश्री शरद पवार, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतीच्या पाहणीसाठी आणि शेतकऱयांच्या डोळय़ातील अश्रू पुसण्यासाठी दौऱयावर आहेत. कोरोना असो, महापूर असो वा अन्य संकट शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. पवारांना तर पाऊस आणि पावसातले भिजणे वरदायी ठरले. एक पाऊस सत्ता देऊन गेला. महाराष्ट्रात मंत्री, मुख्यमंत्री कुणीही असले तरी रिमोट पवारांच्या हातात आहे आणि सत्ता त्यांच्या इशाऱयावर चालते हे नाकबूल करता येत नाही. अरबी समुद्रात झालेला कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे आलेले वादळ-पाऊस यामुळे शेतकऱयांच्या पेकाटात पुन्हा एकदा लाथ बसली आणि खरीप हंगाम पाण्यात बुडाला. जबरी पाऊस पडला, धरणे भरली, नद्यांना पूर आले, शहरातील रस्त्यांना ओढय़ाचे स्वरुप आले. घरे पडली, झाडे उन्मळली. माणसे वाहून गेली. जमिनीची धूप झाली, विहिरी बुजल्या, होत्याचे नव्हते झाले. आभाळच कोसळले. शेतात गुडघाभर पाण्यात सोयाबीन, भुईमूग, भात, उडीद, तूर, भाजीपाला पिके बुडून गेली. कुजली. उस, द्राक्ष, डाळिंब या पिकांना तडाखा बसला. ऊस आडवा झाला. अनेक ठिकाणी जमिनीची धूप झाली. बांध वाहून गेले. शेतकऱयांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले. पंधरा दिवसात पीक निघणार. पीक यंदा चांगले आहे. यंदा दसरा-दिवाळी आनंदाची होणार अशी स्वप्ने पाहणाऱया शेतकऱयांच्या ताटात या संकटाने माती कालवली. तोंडचा घास काढून घेतला. अपरिमित हानी झाली. डोळय़ातील अश्रूही सुकले. मोठी दुरवस्था आली. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकार काय करते याची प्रतीक्षा होती आणि आहे. पण पूर पर्यटना पलीकडे अजून काही झालेले नाही. अमूक नेते थेट बांधावर तमूक नेत्यांचे शेती नुकसान पंचनाम्याचे निर्देश वगैरे बातम्या आणि पूर पर्यटनाचे फोटो यांना ऊत आला आहे. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर अशा बातम्यांची रेलचेल आहे. पण शेतकऱयांना प्रत्यक्ष पदरात काहीच पडलेले नाही. शरद पवारांनी तुळजापूर, औसा, मराठवाडा येथून दौरा सुरू केला आहे. त्यांचे हेलिकॉप्टर तुळजापूरला घिरटय़ा घालून मराठवाडय़ात गेले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सोलापुरातून दौरा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतून नुकसान भरपाई दौरा आरंभला आहे. शेतकऱयांचे नुकसान झाले, शेतीचे नुकसान झाले आणि पाठोपाठ काही वर्षे हा दुर्दैवी फेरा सुरू आहे. कर्जमाफी, तगाई असे प्रयोग आणि घोषणा होत आहेत. आता या बडय़ा नेत्यांच्या दौऱयानंतर ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’त बसून राज्याच्या कारभार चालवतात अशी टीका होते आहे. पण मुख्यमंत्री मातोश्रीतून बाहेर पडून सोलापूर दौरा करणार आहेत. शेतकऱयांना कोण आपल्या बांधावर आले, कुणी काय घोषणा केली आणि कुणी या पावसाच्या संकटाचा राजकीय लाभ उठवला यामध्ये काडीचा रस नाही. त्याला सतावते आहे ती जगण्याची चिंता, समोर असलेल्या रबी हंगामाची चिंता आणि नुकसानीचा फटका बसलेली जमीन पुन्हा कशी लागवडीखाली आणायची हा प्रश्न. शेतीचे कर्ज कसे भागवायचे, पावसाचे पाणी आणि गाळ याने भरलेली विहीर पुन्हा कशी स्वच्छ करायची, रानात बुडालेले पीक बाहेर कसे काढायचे याची विवंचना लागली आहे. कोरोनाचे संकट आहे. शहरातून नोकरी, रोजगार गमावून परतलेले शेतीवरच अवलंबून आहेत. या सर्वांचे कसे भागायचे, भागवायचे हा मूळ प्रश्न आहे. पण या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही. आता तर राज्यातले नेते केंद्राकडे आणि केंद्रातले नेते राज्याकडे बोट दाखवण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी तर महाआघाडीच्या खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार काय करणार असेही सवाल सुरू झाले आहेत. पोकळ घोषणा, निर्देश आणि कागदी उपचार आणि राजकारण सुरू आहे. यातून संतापाचा भडका होण्याचीही शक्यता आहे. केवळ शेतीलाच नाही तर पंढरपूर व अन्य काही गावातील व्यापार पाण्यात बुडाला आहे. काहींची घरे पडली आहेत. माणसे, जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांना मदत करण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट, मंदी, बेरोजगारी, स्थलांतर, बंद उद्योगधंदे, आजारपण कोरोना संकट अशा समस्या टोकदार असताना ‘न भूतो..’ असे हे अस्मानी संकट महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाचे मोठे नुकसान करून गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून या संकटग्रस्तांना सावरण्याची, उभारण्याची ताकद दिली पाहिजे. घोषणा होतीलच. गेली काही वर्षे त्या होत आहेत. सरकारी तिजोरीवर खर्चही पडेल पण मूळ मुद्दा शेतकरी निर्भर होणार किंवा कसे हा आहे. अवघे भारत वर्ष दसरा-दिवाळी करत असताना या शेतकऱयांना आणि संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. केवळ ओला दुष्काळ, फेरकर्ज वगैरे घोषणा नव्हे आणि बांधावर जाऊन पाहणी, फोटो नव्हे तर बांधावर जाऊन सत्वर मदत करण्याची गरज आहे. मागील वर्षी महापुरात नुकसान झालेल्या नागरिक, व्यापारी आणि शेतकऱयांना अशी घरपोच मदत युती सरकारने दिली होती. समोर निवडणुका होत्या. त्यांची पार्श्वभूमी होती. आता निवडणुका नाहीत म्हणून दुर्लक्ष नको. शेतकऱयांना पुन्हा उभा करावेच लागेल. कारण तोच सर्वांचा पोशिंदा आहे. बळीराजा नाराज, मोडून पडला तर कुणाचीच खैर नाही. केंद्राने शेतकरी हिताचे नवे कायदे केले आहेत. आता या संकटातून त्याला बाहेर काढावे लागेल आणि बांधावर जाऊन मदत करावी लागेल. राजकीय नेत्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा आणि कागदी घोडे नाचवण्याचा उद्योग बंद करावा आणि राज्य व केंद्र शासनाने एकत्र येत संकटग्रस्त शेतकऱयाला मदतीचा हात द्यावा.
Previous Articleअवघा चिखल एक झाला
Next Article कोरोना लसीकरणासाठी सांगली सज्ज
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








