र तासप्त सुटका, उद्योजकांत खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील बांधकाम व्यवसायिक मदनकुमार भैरपण्णावर (वय 55) यांचे अपहरण करण्यात आले. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने उद्योजकांत खळबळ माजली असून कोऱया बॉन्डवर सहय़ा घेवून चार तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मदनकुमार हे कणबर्गी रोडवरील श्रुतीपार्कमध्ये राहतात. शनिवारी सकाळी 10.30 ते 10.45 यावेळेत ही घटना घडली आहे. केए 22 एन 3777 या इनोव्हा कारमधून ते नेहमीप्रमाणे हनुमानाच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी घरापासून जवळच अपहरणकर्त्यांनी त्यांना गाठले.
अपहरणकर्ते पांढऱया रंगाच्या होंडासिटी कारमधून आले होते. चार ते पाच जणांनी मदनकुमार यांना मारहाण करुन आपल्या कारमध्ये घेतले. त्यांची इनोव्हा पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोडून देण्यात आली. त्यानंतर तब्बल चार तासांनी बेनकनहळ्ळीजवळ त्यांची सुटका करण्यात आली.
घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हाती घेण्यात आला. मात्र केवळ चार तासांत अपहरणकर्त्यांनी मदनकुमार यांची सुटका केली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असला तरी अपहरणकर्ते कोण? कशासाठी त्यांनी अपहरण केले? याचा उलगडा झाला नाही. अपहरणानंतर आपल्याला मारहाण करण्यात आली. कोऱया बॉन्डवर सहय़ा घेवून आपली सुटका करण्यात आली, अशी माहिती मदनकुमार यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.









