सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाचे कामकाज mahabocw.in या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. सदर कामकाजासाठी या कार्यालयाकडून अथवा मंडळाकडून किंवा शासनाकडून कोणाही मध्यस्थ (एजंट), संघटना वा इतर खाजगी व्यक्तीची नेमणुक करण्यात आलेली नाही. तरी सर्व बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाबाबतच्या ऑनलाईन कामकाजातील शंका समाधानासाठी या कार्यालयीन फोन नंबर 0231-2653714 वर संपर्क साधावा अथवा या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे आवहान सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकरीता सुरूवातीस एकुण 37 रूपये आकारले जातात. (त्यापैकी नोंदणी शुल्क 25 व वार्षिक वर्गणी 12 रूपये ) व तदनंतर नुतनीकरणाकरीता वार्षिक शुल्क 12 रूपये (दरमहा रूपये 1 रूपये प्रमाणे) आकारण्यात येत आहे. या शुल्काव्यतिरीक्त इतर कोणतेही जादा शुल्क रक्कम कोणत्याही कारणाकरीता आकारले जात नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, तसेच कंत्राटदार, नियोक्ता, प्राधिकृत अधिकारी यांनी बांधकाम कामगारास नियोक्ता प्रमाणपत्र देताना सदरची व्यक्ती प्रत्यक्ष काम करीत असल्याचे तपासणी करूनच् दाखले द्यावेत. असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी पत्रकात म्हटले आहे.