दोन ठेकेदारांचा समावेश
तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना
प्रतिनिधी / मालवण:
मालवणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभाग अभियंत्यांनी या कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या आहेत. आनंद हुले यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दोघा ठेकेदारांना बांधकाम विभागाने नोटीस देत तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी, असे म्हटले आहे.
गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रस्त्यावरील फाटय़ावर सुओ मोटो याचिका दाखल करून घेताना महत्वपूर्ण निकाल दिला. रस्त्यावरील खड्डय़ांची तक्रार त्या शहरातील सर्वसामान्य नागरिकही या खात्याकडे करू शकतो. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दहा दिवसांत कारवाई करण्यात आली नाही, तर पोलीस विभागाने तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करावा. मुंबई उच्च न्यायालयाने या निकालाचा हवाला देत मालवणमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांनी तालुक्यात विविध ठिकाणी पडलेल्या खड्डय़ांबद्दल तसेच धोकादायक रस्त्यांबद्दल मालवण नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. दहा दिवसांतही खड्डय़ांबाबत कार्यवाही न केल्याने आनंद हुले यांनी मुख्याधिकारी मालवण नगरपरिषद तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभाग अभियंत्यांनी डी. आर. कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर व आशिष परब, खोटले-मालवण या दोन कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीमध्ये रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची ताकीद दिलेली आहे.
न. प. मुख्याधिकाऱयांकडून दिशाभूल माहिती!
आनंद हुले यांच्या तक्रारीवर मालवणचे मुख्याधिकारी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, मालवणमधील स्पीड ब्रेकर आम्ही दुरुस्त करत आहोत. तसेच दांडी रिंगरोड हा मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारित असल्याने कारवाई करता येत नाही. परंतु हे दोन्ही मुद्दे खोडून काढत आनंद हुले यांनी उत्तर दिले, स्पीडब्रेकर कुठे आणि कधी बसवायचे हे इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावलीप्रमाणे पोलिसांना ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मालवणमधील सर्व स्पीडब्रेकर हे अनधिकृत आहेत तसेच दांडी रिंग रोड ही मालवण नगर परिषदेची मालमत्ता असल्याने त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार नगरपरिषदेला आहेत, असे म्हटले आहे.
कारवाई करण्यास मालवण पोलिसांची टाळाटाळ!
पोलीस विभागाने तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करावा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास मालवण पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप आनंद हुले यांनी केला.









