वार्ताहर / बांदा:
बांदा-दोडामार्ग महामार्ग सद्यस्थितीत प्रवासी, वाहनचालकांसाठी तरी मृत्यूचा सापळाच बनला आहे. संपूर्ण महामार्गावर मोठाले खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघातांना सोमोरे जावे लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ तात्पुरती तरी उपाययोजना करून मार्ग निर्धोक करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. बांदा-दोडामार्ग रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे हा मार्ग अपघातांचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ माठी असते. दोन दिवसांपूर्वी डेगवे परिसरात याच मार्गावर एका दुचाकीस्वाराचा खड्डे चुकविताना अपघात झाला. सुदैवाने वाहनावर नियंत्रण मिळविल्याने किरकोळ दुखापत झाली. दररोज अपघाताच्या घटना घडत असताना खड्डे दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.









