वृत्तसंस्था/ ढाक्का
येथील शेर बांगला नॅशनल स्टेडियमवर रविवारी यजमान बांगलादेश आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याला स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.00 वाजता प्रारंभ होणार आहे. या मालिकेत अनुभवी बांगलादेश आणि लंकन संघातील अनेक नवोदितामध्ये ही लढत असल्याने बांगलादेचा संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यावर अधिक प्रयत्न करेल,.
वनडे क्रिकेटमधील यापूर्वी म्हणजे 2018 आशिया चषक स्पर्धेनंतर झालेल्या द्विपक्षीय मालिकेतील निकालाचा आढावा घेतल्यास दोन्ही संघांनी परस्परावर आपल्या घरच्या मैदानावर एकतर्फी विजय नोंदविले आहेत. केवळ एकदाच या उभय संघातील एका वनडे मालिकेत एकतर्फी विजय नोंदविला गेला नाही.
आयसीसी विश्वचषक सुपर लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यात लंकेचा संघ जवळपास शेवटच्या क्रमांकावर वावरत आहे. कुशल परेराच्या नेतृत्वाखालील लंकेच्या नव्या संघामध्ये यजमान बांगलादेशला त्यांच्या मायभूमीत विजयापासून रोखण्यासाठी दर्जेदार कामगिरी करावी लागेल. लंकन संघाचा उपकर्णधार कुशल मेंडीसला आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखावे लागेल. विश्वचषक सुपर लीग गुणतक्त्यात लंकेचा संघ सध्या 12 व्या स्थानावर आहे.
लंकेने ही आगामी मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली तर लंकेचा संघ गुणतक्त्यात नवव्या स्थानावर झेप घेवू शकेल. बांगलादेशचा संघ विश्व सुपर लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या सहाव्या स्थानावर आहे. या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी बांगलादेशला ही मालिका जिंकणे जरूरीचे आहे. गेल्या मार्च महिन्यात विंडीजच्या दौऱयात झालेल्या वनडे मालिकेत कुशल परेराला संधी मिळाली नव्हती. यजमान बांगलादेश संघामध्ये अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसन आणि मुस्ताफिजुर रेहमान यांचा समावेश झाल्याने बांगलादेशचा संघ पूर्वीच्या तुलनेत अधिक भक्कम झाला आहे. ढगाळ हवामानाचा या सामन्यात अडथळा येणार नाही, असे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
बांगलादेश संघाने 2018 च्या ऑक्टोबरनंतर मायदेशातील वनडे मालिका सातत्याने जिंकल्या आहेत. बांगलादेशने आतापर्यंत शेवटच्या चार वनडे मालिका जिंकल्या आहेत. ढाक्याच्या या स्टेडियमवर दुसऱयांदा फलंदाजी करणाऱया संघाला अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. हवामानात दवाचे प्रमाण असल्याने सामन्याच्या पूर्वार्धात फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी साथ देऊ शकेल. आतापर्यंत या स्टेडियममध्ये पाठलाग करणारे संघ पाच सामन्यात विजयी झाले आहेत. नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरू शकेल. लंकेतर्फे रमेश मेंडीस किंवा चमिका करूणारत्ने यांचे या सामन्यात वनडे पदार्पण होऊ शकेल. शकीब अल हसन फलंदाजीत तिसऱया क्रमांकावर येईल. कर्णधार तमिम इक्बालसमवेत सलामीला सरकार किंवा मिथुन यापैकी एकाला संधी मिळेल.
बांगलादेश संघ- तमीम इक्बाल (कर्णधार), लिटॉन दास, शकीब अल हसन, मुशफिकर रहीम, मेहमुदुल्ला सरकार, मिथुन,मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, मोहम्मद सैफूद्दीन, टी अहमद, एम. रेहमान,
लंका संघ- डिक्वेला, डी गुणतिलका, कुशल परेरा, कुशल मेंडीस, धनंजय डिसिल्वा, डी.शेनका, हेसरंगा, उदाना, सँडेकेन, चमिरा, सी करूणारत्ने आणि बी. फर्नांडो.









