वृत्तसंस्था /पोश्चेफस्ट्रूम :
बांगलादेशच्या युवा संघाने न्यूझीलंड युवा संघाचा गडय़ांनी पराभव करून आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. शतकवीर मेहमुदुल हसन जॉय हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला आणि त्यालाच सामनावीराचा बहुमानही मिळाला. रविवारी जेतेपदासाठी भारत व बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. भारताने ही स्पर्धा चारवेळा जिंकली असून ते विद्यमान विजेतेही आहेत.
बांगलादेश युवा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस पाचरण केले. न्यूझीलंडच्या सुरुवात खराब झाली तरी निकोलस लिंडस्टोन (44) व बेकहॅम व्हीलर ग्रीनॉल (नाबाद 75) यांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे त्यांना 50 षटकांत 8 बाद 211 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर त्यानंतर बांगलादेश युवा संघाने जॉयचे शतक (100) व तौहिद हृदय (40) व शहादत हुसेन (नाबाद 40) यांच्या योगदानामुळे 45 व्या षटकांतच केवळ चार गडय़ांच्या मोबदल्यात 4 बाद 215 धावा जमवित विजय साकार करून दिमाखात अंतिम फेरी गाठली.
भारतीय युवा संघाने सलग तिसऱयांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे तर बांगलादेशने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या सामन्यात बांगलादेशच्या मेहमुदुलने 13 चौकारांच्या मदतीने 100 धावा जमविल्या. बांगलादेशची सुरुवातीला 2 बाद 32 अशी स्थिती झाली होती. पण जॉयने तौहिदसमवेत डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शहादत हुसेनसमवेत चौथ्या गडय़ासाठी 101 धावांची भागीदारी करून संघाला दोनशेचा टप्पा गाठून देत विजयासमीप आणले होते. पण 201 धावसंख्येवर तो बाद झाला. शहादत हुसेन व शमिम हुसेन यांनी नंतर विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. न्यूझीलंडच्या क्लार्क, हॅन्कॉक, आदित्य अशोक, तश्कॉफ यांनी एकेक बळी मिळविले.
त्याआधी न्यूझीलंडच्या डावात ग्रीनॉलने 83 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 75 धावा केल्या. याशिवाय लिंडस्टोनने 74 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. दुसऱयाच षटकात त्यांना पहिला धक्का बसला होता. त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि निर्धारित षटकात 8 बाद 211 पर्यंत मजल मारली. पण ती पुरेशी ठरली नाही. बांगलादेशतर्फे शोरिफुल इस्लामने 10 षटकांत 45 धावा देत 3 बळी मिळविले. याशिवाय शमिम हुसेन व हसन मुराद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. रकिबुल हसनने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : यू-19 न्यूझीलंड संघ 50 षटकांत 8 बाद 211 : व्हाईट 18, लेलमन 24 (50 चेंडूत 3 चौकार), लिंडस्टोन 44 (74 चेंडूत 2 चौकार), तश्कोफ 10 (17 चेंडूत 1 चौकार), व्हीलर ग्रीनॉल नाबाद 75 (83 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), फील्ड 12 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 14. गोलंदाजी : शोरिफुल इस्लाम 3-45, शमिम हुसेन 2-31, हसन मुराद 2-34, रकिबुल हसन 1-35.