वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी येथे खेळविला जाणार आहे. या सामन्याला स्थानिक प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता प्रारंभ होईल. न्यूझीलंडने यापूर्वी कसोटी आणि वनडे मालिका जिंकल्या असून आता ते टी-20 मालिकाही हस्तगत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बांगलादेशचा संघ न्यूझीलंडच्या दौऱयात ही शेवटची मालिका वाचविण्यासाठी प्रयत्न करेल.
एक वर्षांपूर्वी बांगलादेशने झिंबाब्वे विरूद्धची टी-20 मालिका 2-0 अशा फरकानी जिंकली होती. बांगलदेश संघातील अनुभवी मेहमुदुल्लाने क्रिकेटच्या या तीनप्रकारामध्ये आपल्या फलंदाजीत योग्य तो बदल केला. पण, बांगलादेश संघातील इतर खेळाडूंना हे साध्य झाले नाही. बांगलादेश-न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका दोन दिवसांपूर्वी संपली. त्यानंतर आता बांगलादेशच्या खेळाडूंना टी-20 प्रकारात आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल. आयसीसीच्या भारतात होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आता सहा महिन्यांच्या कालावधी राहिल्याने बांगलादेश संघाला क्रिकेटच्या या अतिजलद प्रकारात लवकर जुळवून घ्यावे लागेल.
न्यूझीलंडचा संघ आयसीसीच्या टी-20 मानांकनात पाचव्या स्थानावर आहे. 2020 च्या क्रिकेट हंगामातील न्यूझीलंडने विंडीज, पाक आणि अलिकडेच ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका जिंकल्या आहेत. हॅमिल्टनमध्ये रविवारी वातावरण ढगाळ असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्या जागी नवोदित मोहम्मद नईमची संघात निवड केली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल.









