वृत्तसंस्था/ मनीला
बांगलादेशच्या लस वैज्ञानिक डॉ. फिरदौसी कादरी आणि पाकिस्तानमधील अर्थतज्ञ मोहम्मद अमजद साकिब यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 5 जणांना हा पुरस्कार मिळणार आहे. आशियाचे नोबेल म्हणून ओळखले जाणाऱया रॅमन मॅगसेसे पुरस्काराच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये फिलिपाईन्सचे मत्स्य तसेच सामूहिक पर्यावरणतज्ञ रॉबर्टो बॅलोन, मानवी कार्य तसेच शरणार्थी सहाय्याच्या क्षेत्रात काम करणारे अमेरिकेचे नागरिक स्टीव्हन मुन्सी यांचा समावेश आहे. तर शोध पत्रकारिकतेसाठी इंडोनेशियन वॉचडॉकला पुरस्कार मिळणार आहे.
70 वर्षीय कादरी यांनी ब्रिटनमधील लिव्हरपूल युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट केले आहे. 1988 मध्ये त्या ढाका येथील कॉलरा रोग विषयक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय केंद्राशी जोडल्या गेल्या होत्या. डॉ. कादरी यांना प्रौढ, मुले तसेच नवजातांसाठी कॉलरा प्रतिबंधक तोंडावाटे दिली जाणारी स्वस्त लस तसेच टायफाइडवरील लस विकसित करण्याचे शेय दिले जाते. त्यांनी विकसनशील देशांच्या झोपडपट्टी असलेल्या भागांमध्ये प्रचंड काम केले आहे.
64 वर्षीय पाकिस्तानी कार्यकर्ते साकिब यांनी पहिला व्याजमुक्त सुक्ष्मवित्तसहाय्य कार्यक्रम ‘अखुवत’ विकसित केला आहे. कर्ज परतफेडीचा अभूतपूर्व विक्रम करत, शून्य-व्याजदरावर कर्ज देण्यासाठी प्रार्थनास्थळांचा वापर करणारा हा कार्यक्रम आहे. साकिब यांना त्यांची बुद्धिमत्ता तसेच कारुण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी पाकिस्तानात सर्वात मोठी मायक्रोफायनान्स संस्था उभारली आहे. मानवी मदत आणि एकजूटतेनेच गरीबीच्या उच्चाटनाच्या पद्धती शोधल्या जाऊ शकतात असे त्यांचे मानणे आहे.
मनीलाच्या रॅमन मॅगेसेस केंद्रात 28 नोव्हेंबर रोजी होणाऱया सोहळय़ात या मान्यवरांना औपचारिक स्वरुपात पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.









