पुरासोबत येणाऱया खाऱया पाण्यात घेतले जातेय पिक
बांगलादेशात फ्लोटिंग फार्म (तरंगती शेती) हा प्रकार आता बऱयापैकी रुजला आहे. देशातील बक्शीगंज येथील पखीमारामध्ये तरंगणाऱया या शेतांमध्ये खाऱया पाण्याचा प्रभाव पडू न दिले जाणारे पिक घेतले जात आहे. भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशात पुराचा धोका कायम घेंगावत असतो. समुद्राच्या खाऱया पाण्यासोबत पूर येतो आणि शेतजमिनीत हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी करतो.

निसर्गाच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी बांगलादेश तांदूळ संशोधन संस्थेने धान्याचा एक असा प्रकार विकसित केला आहे, ज्यावर सागरी पाण्याचा प्रभाव पडत नाही. सामुदायिक स्वरुपात तरंगते शेत निर्माण करण्यासाठी चार फुटांपर्यंत खोली असलेल्या पाण्यात जलकुंभी आणि बांबूला बांधण्यात आले. त्यावर लाकूड आणि काथ्या टाकला जातो, हा थर मातीची जागा घेतो. त्यानंतर खतासोबत बीजारोपण केले जाते.
या तरंगत्या शेतीकरता शेतकऱयांना फार मोठा खर्च येत नसला तरीही विशेष काळजी घ्यावी लागते. संशोधनातून विकसित या नव्या प्रकारच्या बिजामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. निसर्गाच्या कोपापासून वाचत नव्याने उभे राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न स्थानिक शेतकऱयांना बळ देणारा आहे. हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर मात करण्याकरता अशाप्रकारच्या नवनव्या प्रयत्नांची गरज माणसांना पुढील काळात भासत राहणार आहे.









