ढाका / वृत्तसंस्था
नवरात्र आणि दुर्गादेवीच्या उत्सावाच्या काळात बांगलादेशात भडकलेली हिंदू विरोधी हिंसाचाराची आग दसरा झाल्यानंतरही कायम आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 6 हिंदूंचा बळी गेला असून मंदिरांना आणि दुर्गापूजेच्या असंख्य मंडपांना आगी लागण्यात आल्या. पोलिसांनी या प्रकरणी 4 हजार लोकांविरोधात आरोपपत्र सादर करण्याची तयारी सुरु केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
वारंवार हिंदू आणि ख्रिश्चनांविरोधात बांगलादेशातील मुस्लीम धर्मांध संघटनांकडून होत असलेल्या हिंसाचारामुळे आता या दोन्ही समुदायांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसाचाराविरोधात एकजूट करुन आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याकांनी सामुदायिक उपोषण करुन हिंसाचाराचा निषेध करण्याची देशव्यापी योजना आखल्याची घोषणा करण्यात आली आहे. हिंदू अल्पसंख्याकांपैकी कोणीतरी पवित्र कुराणचा अवमान केला, असा कांगावा काही मुस्लीम संघटनांनी केल्यानंतर हिंसाचाराला प्रारंभ झाला. मात्र कुराणच्या अवमानाचा प्रकार घडलेलाच नाही, असे नंतर पोलीस तपासात निष्पन्न झाले. तरीही हिंसाचार थांबलेला नाही.
बांगलादेशातील हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता मंडळाने 23 ऑक्टोबरपासून उपोषण आंदोलनाची हाक दिली आहे. ढाका येथील शहाबाग येथे हा धरणे आणि उपोषणाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी या मंडळाने चितगांव येथे सहा तासांचा बंद पाळला होता तसेच निदर्शनेही केली होती.









