ईशान्येतील राज्यांवर वक्रदृष्टी भोवणार : म्यानमारसोबत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईशान्येतील राज्यांवरून बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारत आणि बांगलादेशदरम्यान तणाव आहे. या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेश विरोधात कठोर पावले उचलली आहेत. भारताने बांगलादेशातून येणारे रेडीमेड गार्मेंट्स आणि अन्य उत्पादनांच्या आयातीवर कठोर निर्बंध लादले आहेत. बांगलादेशकडून भारतीय धागे, तांदूळ आणि अन्य सामग्रीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या प्रत्युत्तरादाखल उचलण्यात आले आहे. भारताने आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम आणि पश्चिम बंगालच्या फुलबारी आणि चांगराबंधा यासारख्या भूमी बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशी सामग्रीच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
याचबरोबर भारत आता बांगलादेशला पूर्णपणे एकाकी पाडण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने ईशान्येतील राज्यांना कोलकात्याशी जोडण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प म्यानमारमार्गे सागरी मार्गाने जाणार असून बांगलादेशला यात स्थान नसेल. या प्रकल्पात मेघालयाच्या शिलाँगपासू आसामच्या सिल्चरपर्यंत 166.8 किलोमीटर लांबीचा चारपदरी द्रुतगती महामार्ग सामील असून तो म्यानमारमध्ये सुरू असलेल्या ‘कलादान मल्टी-मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट’चा विस्तार असेल. हे पाऊल क्षेत्रीय संपर्कव्यवस्था वाढविण्यासह भारताची सामरिक स्वायत्तता आणि ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ला मजबूत करणार आहे.
म्यानमारमार्गे नवा कॉरिडॉर
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अलिकडच्या काळात दुरावल्याने ईशान्य भारतापर्यंत संपर्कासाठी कलादान मल्टी-मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचे महत्त्व वाढले आहे. म्यानमारमार्गे मिझोरमला कोलकाता आणि विशाखापट्टणमशी जोडणारा हा बहुप्रतीक्षित प्रकल्प आता भारतासाठी रणनीतिक स्वरुपात अधिकच महत्त्वाचा ठरला आहे.
शिलाँग-सिल्चर महामार्गाला मंजुरी
याचबरोबर रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने शिलाँग ते सिल्चरपर्यंतच्या 166.8 किलोमीटर लांबीच्या चारपदरी महामार्गाला मंजुरी दिली आहे. हा महामार्ग पुढे मिझोरमच्या जोरिनपुईपर्यंत वाढविला जाईल आणि कलादान प्रकल्पाला ईशान्येतील द्रुतगती मार्गाला जोडणार आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या भारतविरोधी टिप्पणीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बांगलादेशच्या नव्या भूमिकेमुळे चिंता
बांगलादेशात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून दूर करण्यात आल्यापासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये घसरण झाली आहे. अलिकडेच बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनच्या दौऱ्यादरम्यान ईशान्य भारताला ‘भूवेष्टित’ ठरवत बांगलादेश हा समुद्राचा एकमात्र संरक्षक असल्याचा दावा केला होता. या टिप्पणीला भारताने आक्षेपार्ह अन् रणनीतिक स्वरुपात संवेदनशील मानले, कारण हे ईशान्य भारतासाठी महत्त्वपूर्ण ‘चिकन नेक’ कॉरिडॉरच्या सुरक्षेशी निगिडत आहे.
कलादान प्रकल्प
कलादान मल्टी-मॉडेल प्रोजेक्टकरता भारत आणि म्यानमार यांच्यात 2008 साली स्वाक्षरी करण्यात आली होती. याचा उद्देश म्यानमारच्या रखाइन प्रांतातील सितवे बंदराला मिझोरमशी जोडणे आहे. याच्या माध्यमातून कोलकाता येथून सामग्री मिझोरमपर्यंत कमी कालावधीत पोहोचविता येणार आहे. या प्रकल्पामुळे कोलकाता ते मिझोरमपर्यंतचे अंतर सुमारे 1 हजार किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी 3-4 दिवसांनी घटणार आहे.









