ऑक्सिजन एक्स्प्रेसने पाठविला 200 टन मेडिकल ऑक्सिजन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेजारी देशांच्या मदतीसाठी भारताने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कोरोना महामारीच्या अवघड स्थितींमध्ये भारताने आता बांगलादेशला मदत केली आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनद्वारे भारतीय रेल्वे 200 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची खेप रविवारी बांगलादेशात पोहोचविणार आहे. या मदतीमुळे बांगलादेशला कोरोनाविरोधातील लढाईकरता बळ मिळणार आहे.
हा जीवनरक्षक वायू देशाबाहेर पाठविला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. झारखंडच्या टाटानगरमधून 10 कंटेनर असलेली ही रेल्वे शनिवारी रवाना झाली आहे. ही रेल्वे आज बांगलादेशच्या बेनापोल येथे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात महामारीच्या दुसऱया लाटेदरम्यान राज्यांमधील ऑक्सिजनच तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस ही सेवा सुरू केली होती. एकेवेळी मेडिकल ऑक्सिजनची मागणी 9 हजार टन प्रतिदिनाच्या नजीक पोहोचली होती. रेल्वेने 24 एप्रिल रोजी या मोहिमेची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत अशा 480 रेल्वेफेऱयांचे आयोजन केले आहे. देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये रेल्वेने 38,841 टन ऑक्सिजन पोहोचविला आहे.









