स्वातंत्र्य दिन सोहळय़ात राहणार उपस्थित
वृत्तसंस्था/ ढाका
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित होणाऱया कार्यक्रमात सामील होणार आहे. पंतप्रधान मोदी 26 मार्च रोजी बांगलादेशची राजधानी ढाक्यात पोहोचणार आहे. वंगबंधू शेख मुजीबुर्रहमान यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही मोदी सहभागी होणार असल्याची माहिती बांगलादेशचे विदेशमंत्री अब्दुल मोमिन यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱयात बांगलादेश आणि भारतादरम्यान प्रलंबित द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा होणार नाही. मोदींच्या दौऱयामुळे आम्ही आनंदी आहोत, हा दौरा राजकीय परिपक्वता आणि कामगिरी दर्शवितो. कोरोना संकटादरम्यान मोदींचा हा पहिला विदेश दौरा आहे. अन्य देशांचे नेते केवळ ढाक्याचा दौरा करायचे, पण मोदी देशाच्या अन्य हिस्स्यांना भेट देणार असल्याचे मोमिन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा तीन मोठय़ा कारणांमुळे आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. वंगबंधू शेखर मुजीर्बरहमान यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. याचबरोबर भारत-बांगलादेश यांच्या कुटनीतिक संबंधांचे हे 50 वे वर्ष आहे.
डिसेंबर 2020 मध्ये शेख हसिना यांच्यासोबतच्या आभासी बैठकीत पंतप्रधान मोदींनी बांगलादेश दौऱयाची घोषणा केली होती. या दौऱयाच्या तयारीकरता जानेवारी महिन्यात बांगलादेशचे विदेश सचिव मसूद बिन मोमिन भारतात आले होते. तर त्यानंतर भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर एक दिवसाच्या बांगलादेश दौऱयावर गेले होते.









