कोणत्याही क्रिकेट प्रकारात किवीज भूमीतील पहिला विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी, इबादोतचे डावात 6 बळी
माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज इबादत हुसेनने 46 धावात 6 बळी अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी बजावल्यानंतर बांगलादेशने विश्व कसोटी चॅम्पियन न्यूझीलंडचा तब्बल 8 गडी राखून धोबीपछाड केला. न्यूझीलंडच्या भूमीत बांगलादेशसाठी हा कोणत्याही क्रिकेट प्रकारातील पहिलाच विजय आहे.
या लढतीत न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 328 धावा केल्यानंतर बांगलादेशने सर्वबाद 458 धावांसह डावाअखेर 130 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या 169 धावात संपुष्टात आल्यानंतर बांगलादेशसमोर 40 धावांचे नाममात्र आव्हान होते. ते त्यांनी सहज पार केले.
इबादतने चौथ्याच दिवशी 39 धावात 4 बळी असे पृथक्करण नोंदवत आपल्या संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले होते. बुधवारी त्याने सामन्याच्या पाचव्या दिवशी आणखी 2 गडी स्वस्तात गारद केले आणि नंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या 169 धावांमध्ये संपुष्टात आला. न्यूझीलंडची ही बांगलादेशविरुद्ध निचांकी धावसंख्याही ठरली.
या लढतीत न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावाअखेर 130 धावांनी पिछाडीवर होता आणि हीच बाब त्यांना फटका देणारी ठरली. न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या 169 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशला विजयासाठी 40 धावांचे सोपे टार्गेट होते. ते त्यांनी 2 गडय़ांच्या बदल्यात 16.5 षटकात सहज साध्य केले.
बांगलादेशसाठी हा विदेशातील केवळ सहावा विजय ठरला. शिवाय, कसोटी मानांकनात पहिल्या पाचमधील एखाद्या संघाविरुद्ध मिळविलेला पहिलाच विजय ठरला. न्यूझीलंडचा संघ सध्या आयसीसी कसोटी मानांकनात दुसऱया स्थानी आहे तर बांगलादेश नवव्या स्थानी आहे. या निकालामुळे न्यूझीलंडची मायदेशात सलग 17 सामन्यात अपराजित राहण्याची मालिका देखील संपुष्टात आली. उभय संघातील दुसरी व शेवटची कसोटी दि. 11 जानेवारीपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवली जाईल.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 328. बांगलादेश पहिला डाव ः सर्वबाद 458. न्यूझीलंड दुसरा डाव ः सर्वबाद 169 (विल यंग 172 चेंडूत 7 चौकारासह 69, रॉस टेलर 2 चौकारासह 40, रचिन रविंद्र 16. इबादत होसेन 21 षटकात 46 धावात 6 बळी, तस्किन अहमद 3-36, मेहदी हसन मिराझ 1-43). बांगलादेश दुसरा डाव (टार्गेट 40) ः 16.5 षटकात 2 बाद 42 (नझिमूल 17, मोमिनूल हक नाबाद 13, मुश्फिकूर रहीम नाबाद 5. साऊदी व जेमिसन प्रत्येकी 1 बळी).
व्हॉलिबॉलमधून कसोटीकडे मोर्चा वळवणाऱया इबादतचा भेदक मारा
माजी व्हॉलीबॉलपटू असलेल्या इबादतने दुसऱया डावात 46 धावात 6 बळी घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. इबादतला जलद गोलंदाजी स्पर्धा जिंकल्यानंतर बांगलादेशच्या कसोटी संघात स्थान लाभले. या लढतीत तिसरा सीमर म्हणून तो उतरला, त्यावेळी त्याच्या खात्यावर फक्त 11 कसोटी बळी होते. न्यूझीलंडने पहिल्या डावात 328 धावा केल्या, त्यावेळी इबादतला एकच बळी मिळाला होता. येथे मात्र त्याने साऱया सामन्याचा नूर पालटला.
कोट्स
आजच्या या विजयाचे वर्णन करण्यास माझ्याकडे शब्दही नाहीत. हे निव्वळ अविश्वसनीय आहे. काल रात्री दडपणामुळे मी झोपूही शकलो नव्हतो. आज काय होऊ शकेल, हेच विचार मनात घोळत होते.
-बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक
या विजयाचे श्रेय मी जन्माने कॅरेबियन असणारे गोलंदाजी प्रशिक्षक ओटिस रॉबिन्सन यांना देऊ इच्छितो. जलद गोलंदाज या नात्याने त्यांचा आम्हा सर्वांच्या जलद गोलंदाजीवर प्रचंड प्रभाव राहिला. 11 वर्षांमध्ये आम्हाला किवीज भूमीत एकही विजय संपादन करता आला नव्हता. पण, ती श्रुंखला आम्ही येथे मोडीत काढली आहे.
-बांगलादेशचा जलद गोलंदाज इबादत होसेन
पहिल्या दिवसातील आमची कामगिरी अगदीच निराशाजनक होती. बांगलादेशने पहिल्या डावातील दमदार फलंदाजीच्या बळावर आमच्यावर दडपण आणले. त्यांची गोलंदाजीही भेदक होती. पाचही दिवसात त्यांनी आमच्यावर वर्चस्व गाजवले.
-न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम









