सावंतवाडी:
एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे 29 जानेवारी रोजी भारत बंद ठेवण्यात येणार आहे. या भारत बंदमध्ये सर्व समाज, व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाचे सिंधुदुर्ग संयोजक ऍड. एस. व्ही. कांबळे यांनी सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भारतमुक्ती मोर्चा, ओबीसी जनगणना संघर्ष समिती जिल्हा संयोजक प्रसाद जळवी, बहुजन क्रांती मोर्चाचे सावंतवाडी संयोजक लाडू जाधव, राजू कदम, संकेत कुडाळकर, दिलीप इन्सुलकर, अनिकेत जाधव, अमर जाधव उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, केंद्र सरकारने एनआरसी व सीएए या कायद्याच्या जाचक अटीमुळे भारतातील सर्व सामाजातील नागरिकांना भारतीय असल्याचा पुरावा सादर करताना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. जर सरकारला एनआरसी, सीएए या कायद्याची अंमलबंजावणी करावयाची असेल तर त्यांनी डीएनए चाचणीच्या आधारे करावी, ओबीसीची जनगणना जातीनिहाय पद्धतीने करावी तसेच इव्हीएमद्वारे मतदानाला विरोध आहे. या मागणी व नागरिकांच्या हितासाठी देशात 29 जानेवारी रोजी भारत बंद ठेवले जाणार आहे. या बंदमध्ये देशातील तीस हजारहून अधिक संघटना बंदला समर्थन देणार आहे, अशी माहिती प्रसाद जळवी यांनी दिली.









