सांगरूळ / वार्ताहर
बहिरेश्वर (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच साऊबाई नारायण बचाटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. करवीरचे विकास अधिकारी जयवंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत प्रत्यक्ष मतदानाने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला .
लोकनियुक्त सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावरील अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेत सकाळी आठ ते अकरा या वेळेत मतदार नोंदणी करण्यात आली. यावेळी गावातील एकूण पात्र २०४५ मतदारांपैकी १९३४ मतदारांनी उपस्थित राहून नोंदणी केली. यानंतर सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान झाले यावेळी १९०३ मतदारांनी मतदान केले .यापैकी १८६१ मते वैद्य तर ४२ मते अवैद्य ठरली .एकूण वैद्य मता पैकी ११११ मध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने पडली तर ७५० मते अविश्वास ठरावाच्या विरुद्ध बाजूला पडली . ३६१ इतक्या मताधिक्याने सरपंच साळुबाई बचाटे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला .
दोन महिन्यापूर्वी उपसरपंचासह सदस्य युवराज दिंडे, तानाजी गोधडे, उत्तम चव्हाण, कृष्णात सुतार, रंजना संभाजी दिंडे, रंजना रामचंद्र दिंडे, मीनाक्षी गोसावी, योगीता गोसावी व शालाबाई कांबळे यांनी सरपंच बचाटे या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात हे कारण दाखवत नवीन शासन निर्णयाच्या आधारावर करवीर तहसीलदार कार्यालयात तक्रार करत अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर निर्णय घेण्यासाठी तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या झालेल्या विशेष सभेत एकविरुद्ध दहा मतांनी
अविश्वास ठराव मंजूर झाला होता
यावेळी सत्ताधारी गटाने नवीन सरपंच व उपसरपंच यांची निवड केली होती. या निर्णयाविरोधात सरपंच साऊबाई बचाटे यांनी न्यायालयात धाव घेतली होती . न्यायालयाने नवीन सरपंच निवडीला स्थगिती दिली होती. लोकनियुक्त सरपंचाची निवड ही जनतेतून थेट मतदानाने होत असल्यामुळे सदस्यांच्या बहुमतावर लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव आणता येत नाही. लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठरावाचा निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते . यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती .
जुलै २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे सीताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतून लोकनियुक्त सरपंच बचाटे यांच्यासह आघाडीची सत्ता आली होती. पण गटा अंतर्गत असलेल्या अंतर्गत मतभेदामुळे अविश्वास ठराव आणण्यात आला .लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर होण्याची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे . यावेळी ग्रामविकास अधिकारी आर आर भगत तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांचे सह निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी उपस्थित होते .









