सरपंच जाधव यांच्यासह ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान
वारणानगर / प्रतिनिधी
बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव यांना आदर्श यशवंत सरपंच तर ग्रामपंचायतीला यशवंत ग्रामपंचायत हे जिल्हा परिषदेचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यानिमीत्ताने बहिरेवाडीला यशवंत पुरस्काराचा डब्बल धमाका लागला आहे. सरपंच शिरीषकुमार हिंदुराव जाधव यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील उत्तुंग कार्याची दखल घेत जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा सन २०२१-२२ चा आदर्श यशवंत सरपंच पुरस्कार तसेच ग्रामपंचायतीला देखील आदर्श यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या एका विशेष समारंभात राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने,आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंत शिंपी, कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बहिरेवाडीचे लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावात सुमारे पाच कोटींच्या वर विविध योजना व भरीव निधी आणून विकासकामे केली आहेत.गावात अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरण, गटर्स, बाजार कट्टा,स्मशानभूमी ,शाळा, अंगणवाडी यांच्या सुधारणासह सुशोभीकरणाचे भरीव काम केले आहे.
मुलांसाठी शोभाताई कोरे चिल्ड्रन पार्क ,वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र ,गावाला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा नियमित पुरवला आहे. गावातील महिला युवती व युवकांसाठी विविध प्रशिक्षणे ,शिबिरे व आरोग्य विषयक कार्यक्रम राबवले आहेत. सात कोटींचा भरीव निधी खेचून आणत गावासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरीचे भव्यदिव्य काम केले आहे. यासारख्या विविध विकास कामांच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात केले आहे.
या त्यांच्या उत्तुंग कार्याची पोचपावती म्हणूनच त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा हा सन्मानाचा आदर्श यशवंत सरपंच पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेने गौरविले आहे. सरपंच शिरीषकुमार जाधव यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे वडील आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांची त्यांना मोलाची साथ व योग्य मार्गदर्शन मिळाले असून ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य यांच्यासह ग्रामसेवक व सर्व कर्मचारी यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याचे सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी आवर्जून सांगितले.









