वारणानगर / प्रतिनिधी
बाबू पार्क, बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील देशी दारूच्या मद्यसाठ्यावर पोलीसांनी छापा टाकून मारूती कारसह अडीच लाख रु. मुद्देमाल जप्त करीत दोघांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विषेश तपास पथकात नेमणूकीस असलेले गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुनिल बळीराम कुंभार यानी याबाबत फिर्याद सोमवार दि. १० मे रोजी रात्री उशीरा नोंदवली आहे.
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास एक्साईड बॅटरी शोरुम समोर रोडवर बाबु पार्क बहीरेवाडी ता. पन्हाळा येथे पोलीसांनी टाकलेल्या मद्य साठ्यात देशी दारू संत्रा असे लेबल असलेल्या कागदी बॉक्स ४० एका बॉक्स १८० मिलीच्या ४८ बाटल्या अशा एकुण १९२० काचेच्या बाटल्या प्रत्येकी ५२ रु. दराच्या मिळुन एकूण किंमत ९९ हजार ८४० रु. मारुती कंपनीची ओमनी कार १ लाख ५० हजार रू. अशी एकूण मुद्देमाल २ लाख ४९ हजार ८४० रू. पोलीसांनी जप्त केला असून, या प्रकरणी महेश बाळासो पाटील वय ३१ रा. जुने पारगांव ता. हातकणंगले व राजाराम नामदेव साठे वय ४५ रा. गणेश पार्क कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखणेकरीता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून विना मास्क वापरता अगर इतर कोणतेही कापड न वापरता आरोपी यांनी आपल्या मारूती ओमनी गाडीतुन बेकायदा बिगर परवाना दारू प्रोव्हिदिशन गुन्ह्याचा माल स्वतःचे फायद्याकरीता विक्री करणेचे उद्देशाने वाहतुक करताना पोलीसांनी पकडून गुन्हा दाखल केला आहे.
करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मद्यसाठा छाप्यातील कारवाईचा तपास फौजदार नरेंद्र पाटील करीत आहेत.









