प्रा. मनीषा नेसरकर यांनी मांडले विचार : कै. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत गुंफले दुसरे पुष्प
प्रतिनिधी /बेळगाव
बहिणाबाई या स्वतः अशिक्षित असल्या तरी त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांनी अजरामर असे काव्य निर्माण केले आहे. आज आयुष्यात जरासे जरी दुःख आले तरी माणूस कोलमडतो. सर्व दुःखे माझ्याच नशिबी का, असा विचार करतो. परंतु बहिणाबाईंच्या वाटय़ाला दुष्काळ, नवऱयाचा मृत्यू, मुलाचा आजार असे चहुकडून दुःखाचे डोंगर असतानाही त्यांनी आपला संसार कोलमडू दिला नाही. त्यांनी आयुष्यात जे भोगले तेच त्यांच्या काव्यातून बाहेर पडले. सर्वसामान्यांच्या जीवनातील हे काव्य असल्यामुळे हे काव्य अजरामर ठरले, असे विचार प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी मांडले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या अनुदानांतर्गत सरस्वती वाचनालय शहापूर यांच्यावतीने आयोजित कै. यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी रविवारी गुंफले. त्यांनी बहिणाबाई चौधरी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार व कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर होते.
आज प्रत्येकालाच दुसऱयाच्या सांत्वनाची गरज भासत आहे. परंतु बहिणाबाई मात्र माझे कुणीही सांत्वन करू नये ,असे आपल्या कवितेतून म्हणतात. नवऱयाचे निधन झाल्यानंतर सांत्वन करण्यासाठी आलेल्या महिलांना त्या म्हणतात,
‘नका नका आयाबाया,
नका करू माझी कीव,
झालं माझं समाधान,
आता माझा माले जीव.
इतरांकडून सांत्वन करून घेणे थांबविले की स्वतःला आपल्या मार्गाने पुढील आयुष्य जगात येते, असे त्यांनी कवितेतून सांगितल्याचे प्रा. नेसरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता मोरे यांच्या इशस्तवनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी केले. वक्त्यांचा परिचय विजय देशपांडे यांनी करून दिला. वाचनालयाच्यावतीने अक्षता मोरे, प्रज्ञा जोशी व निशा तेंडोलकर यांचा सन्मान करण्यात आला. निशा तेंडोलकर यांनी बहिणाबाईंची अरे संसार संसार ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जोशी यांनी केले. विजय देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बेळगाव परिसरातील श्रोतृवर्ग उपस्थित होता.









